लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दरवर्षी पूरपरिस्थिती व नदीतील गाळाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत नदीकिनाऱ्यावर टाकलेल्या मकिंगची विल्हेवाट लावणे गरजेचे असून, हे काम तातडीने करावे, अशी मागणी जलदूत शाहनवाज शाह यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी वाशिष्ठी नदीवरील गोवळकोट बंदर येथे मोठमोठ्या बोटी येत. तसेच चिपळूण शहरातील बाजारपुलाजवळ असणारा बंदर नाका येथे मोठमोठी शिडाची गलबते येत. या ठिकाणी नगर परिषदेचा जकात नाकाही होता. सन १९५१ ला कोयना जलविद्युत प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू झाले व त्याला १९५३ मध्ये मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही १९५४ साली झाली. या प्रकल्पाचे सर्व अवजड सामान व यंत्रसामग्री गोवळकोट धक्का येथे बोटीद्वारे येऊन ती मोठ्या वाहनाने कोयना धरणावर नेण्यात आली. परंतु, आता वाशिष्ठी नदी ही पूर्णपणे दगड-गोटे मकिंग व गाळाने भरलेली आहे.
या विद्युत प्रकल्पामध्ये चारीही स्तरांवर विद्युतनिर्मितीकरिता मोठमोठे बोगदे खणण्यात आले. या बोगद्यांतून निघालेले अब्जा-अब्जावधी घनमीटर दगडगोटे व मकिंग हे येथून निघणाऱ्या उपनदी व नदीकिनारी ठेवण्यात आलेले आहेत. याबाबत अद्याप कोणताही शासकीय अधिकारी व शासनाने कोणताही विचार केलेला नाही. हे नदीकिनारी असणारे अब्जा-अब्जावधी घनमीटर दगडगोटे व मकिंग पावसाच्या काळात हे वाशिष्टी नदीमध्ये येतात व त्यामुळे नदीपात्राची खोली कमी होत आहे. या नदीतील गाळ जरी काढण्यात आला तरी हे चक्र पुनश्च जोमाने सुरू होते. २२ जुलै २०२१ रोजी कोळकेवाडी धरणातून विद्युतनिर्मितीकरिता जाणाऱ्या बोगद्याच्या ठिकाणी वरील भागावरील साठा करून ठेवलेले हजारो घनमीटर दगडगोटे व मकिंग वाहून या ठिकाणी आले व चौथ्या स्तरावरील विद्युतनिर्मिती बंद झाली. येथील हे दगडगोटे व मकिंग काढण्याचे काम आजही सुरू आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी, कोळकेवाडी, अलोरे ते अगदी कान्हे पिंपळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी दगडगोटे व मकिंग यांचा जो साठा करून ठेवला आहे, त्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी शाह यांनी केली आहे.