रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठीचे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. राजापूर मतदारसंघात उद्धव सेनेचे आमदार राजन साळवी यांना परत उमेदवारी मिळालेली असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी तीव्र शब्दात त्याबाबत नाराजी व्यक्त करुन ही निवडणूक लढवण्याचा निर्धार मंगळवारी जाहीर केला. पक्षाने उमेदवारी दिली तर अपक्ष लढण्याची तयारीही त्यांनी केली आहे.मंगळवारी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक रत्नागिरीतील काँग्रेस भवनमध्ये झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर अविनाश लाड यांनी आपली भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून व प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीला, एक काँग्रेसला आणि तीन उद्धवसेनेला असे दिले जातील, असा आमचा अंदाज होता. मात्र आमच्या कानावर आलेल्या चर्चेनुसार चार मतदारसंघ उद्धवसेनेला आणि एक मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला जाणार आहे.राजापूर मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचेही आपण माध्यमांमध्ये वाचले. त्याबाबतच काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवावी, असा मुद्दा कार्यकर्त्यांनी मांडला आणि त्यानुसार आपण २४ रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीच्याच आमदारावर टीकाविद्यमान आमदार राजन साळवी महाविकास आघाडीचेच आहेत. मात्र त्यांनी काहीच काम केले नसल्याची टीका अविनाश लाड यांनी केली. रोजगार, रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी यातील कोणत्याही विषयात काम झाले नसल्याचा आरोप लाड यांनी केला.
तर अपक्ष लढेनआपण पक्षाकडूनच उमेदवारी अर्ज भरणार आहोत. अर्ज भरल्यानंतर वरिष्ठांना भेटणार आहे. पक्षाने आपली उमेदवारी मान्य केली नाही तर अपक्ष लढू. पण आपण ही निवडणूक लढवणारच असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष आपल्यावर ही वेळ येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.