रत्नागिरी : कार्यारंभी ज्यांचे स्तवन केले जाते ते गणपतीबाप्पा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात विविध ठिकाणी विविध रूपांत दिसतात व पुष्कळ ठिकाणी गणांचे नेतृत्व करणारे गणाधीश म्हणून त्यांचे रूप दिसते. विघ्नांचे हरण करणारा तो विघ्नहर्ता, असे प्रतिपादन पुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. मंजिरी भालेराव यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय विस्तार सेवा मंडळ, रामटेक व गोगटे- जोगळेकर महाविद्यालय संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गणेश देवता : उगम आणि विकास’ या विषयावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथील प्राध्यापिका डॉ. भालेराव यांच्या राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भालेराव बोलत होत्या.
श्रीगणेशाची मूर्तीरूपात पूजा सुरू होण्यापूर्वीच गणेश ही संकल्पना जगाच्या विविध भागांमध्ये अस्तित्वात होती व पुढे पुढे अनेक रूपांमध्ये कालांतराने गणेशमूर्ती साकारल्या गेल्या. त्यांनी सुरुवातीची गणपतीची कल्पना ते अष्टविनायक असा प्रवास उलगडला. गणपतीची यक्षराज, देहली विनायक, हेरंब गणेश अशी वेगळी नावे त्यांनी सांगितली. यक्षराज विनायकाची मूर्ती वाराणसीत आढळली असल्याची माहिती सांगत असतानाच गणेशाच्या विविध रूपांची माहिती दिली. पीपीटीच्या माध्यमातून विविध चित्रेही दाखविली.
कार्यक्रमासाठी विस्तार सेवा मंडळाचे संचालक डॉ. कृष्णकुमार पांडेय, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा परिचय गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृतविभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी करून दिला.
विस्तार सेवा मंडळाचे संचालक डॉ. कृष्णकुमार पाण्डेय यांनी मनोगत व्यक्त करताना, गणेशभक्ती ही संपूर्ण महाराष्ट्राला अभिप्रेत आहे. संस्कृत भाषेचा संस्कृतीशी संबंध आहे. संस्कृतनिष्ठ समाज निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी गणेशाचे महत्त्व ज्ञानेश्वरीसारख्या शास्त्रीय ग्रंथातून कळते, असे सांगितले. त्यांनी या वेळी काही पद्यरचना सादर केल्या. विस्तार सेवा मंडळाच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयिका व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात १५० मान्यवर सहभागी झाले होते.