जलस्रोत आटले
आवाशी : खेड तालुक्यात सध्या रणरणत्या उन्हाचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. उष्णतेचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचला आहे. उन्हाच्या कडाक्याने नैसर्गिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे आता दुर्गम भागातील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. नजीकच्या काळात तालुक्यातील ५९ गावांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विनामास्क कारवाई
राजापूर : वीकेंड लॉकडाऊन संपताच शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. नागरिक बेशिस्तपणे सोशल डिस्टन्सिंग न पाळता वावरत होते. त्यामुळे राजापूर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या १५ जणांवर दंडात्मक कारवाई केली तर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बागायती नष्ट
दापोली : मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यातील सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील सुपारी बागा निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्याने पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. या बागायतदारांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी कोकण कृषी विद्यापीठ आणि शासनाने या झाडांची पूर्तता करून वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.
फळबागांची नासाडी
देवरुख : अनेक गावांमध्ये विविध फळांची झाडे घरांच्या आवारात लावण्यात आली आहेत. सध्या या झाडांवर फळेही लागली आहेत. मात्र माकडांचा उच्छाद सुरू झाल्याने ही माकडे या फळांची नासाडी करीत आहेत. काही माकडे आक्रमकपणे घरात घुसू लागल्याने ग्रामस्थांनी या माकडांचा धसका घेतला आहे.