शिरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी तिसऱ्या वर्षी मातृत्व हरवलेल्या संभाजी राजेंना केवळ स्वराज्यासाठी वयाच्या सातव्या वर्षी गहाण ठेवले होते. वयाच्या आठव्या वर्षी मथुरेत संभाजी राजेनी शिवरायांना माझ्यापेक्षा स्वराज्याला तुमची गरज असल्याचे सांगितले होते. वयाच्या दहाव्या वर्षी आठ भाषा अवगत असणाऱ्या संभाजी राजांनी चार ग्रंथ लिहिले. ३२ वर्ष स्वराज्यासाठी जगलेल्या छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास मात्र मनुवाद्यांनी विकृत लिहिला. ही शोकांतिका मराठा बहुजन समाजाने जाणावी, असे प्रतिपादन प्रा. यशवंत गोसावी यांनी चिपळूण येथे केले. संभाजी ब्रिगेडतर्फे चिपळूण येथे प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आपल्या तडाखेबाज व्याख्यानात प्रा. गोसावी यांनी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजांच्या जीवन संघर्षाची पाने उलगडली. केवळ शिवनीती, मावळ्यांची निष्ठा व सह्याद्रीच्या साथीने स्वराज्याचे ६० हजार सैन्य औरंगजेबाचे लाखो सैनिकांना भिडत असताना कोणताही धार्मिक संघर्ष नव्हता तर रयतेच्या राज्यासाठीचा हा राजकीय संघर्ष होता. मात्र, आजवरच्या मनुवादी इतिहासकारांनी खोटा इतिहास पुढे आणून धर्माचे राजकारण केले. औरंगजेबसह शायिस्तेखान, सिध्दी हे भारताबाहेरील मुस्लिम होते. भारतीय मुस्लिम बहुसंख्येने शिवरायांसोबतच इमानदार राहिले. तथापि, आजची पिढी खरा इतिहास जाणत नाही. आम्ही बिडीला संभाजी, शिवाजी व मंडईला महात्मा फुले नाव देत राहिलो. छत्रपती संभाजीना औरंगजेबाने केवळ दोन प्रश्न विचारले होते. त्याची मुलगी जैबुनिसा ५१ वर्षाची व संभाजी ३२ वर्षाचे मग इतिहास विकृत का लिहिला? संभाजी राजेंची हत्या मनुस्मृतीच्या निर्देशानुसारच झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूची बातमी पन्हाळ्यावरच्या संभाजीना दोन महिन्यांनी कळविणाऱ्या अधिकाऱ्यांना रायगडावर शिक्षा झाली. त्यांच्या वारसांनी संभाजीना पुढील काळात बदनाम केले. मराठा बहुजनांनी इतिहास घडवला. मात्र, मनुवादी कावळ्यांनी तो लिहिला इथे सगळा घोळ झाला. प्रा. गोसावी यांनी इतिहासाचे पुनर्लेखन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आजच्या तरुणांनी राजकारण घरात नेऊ नये. राजकारणामुळे जसे चंद्र, सूर्य एकत्र येत नाहीत, तशी रक्ताची माणसे दुरावतात, असे सांगतानाच याबाबतचे दाखलेही दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मुजफ्फर सय्यद, जिजाऊ ब्रिगेडच्या मालती पवार, सतीश मोरे, रावी मोरे, सीमा चाळके, सुचित सुतार, रोहन सुर्वे, संतोष सावंत निर्मला जाधव, अंजली कदम, मानवाधिकार संघटनेचे मंगेश माटे, रफीक केरोटगी उपस्थित होते. समीक्षा भोसले यांनी जिजाऊ वंदन गीत सादर केले. सूत्रसंचालन मकरंद जाधव यांनी केले. (वार्ताहर)
संभाजी राजांच्या इतिहासाचे विकृत लेखन
By admin | Published: May 16, 2016 12:34 AM