रत्नागिरी : जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांना शेती तसेच बागायतीच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी ७ कोटी ९ लाख रूपयांचा निधी सर्व तालुक्यांकडे वितरीत करण्यात आला आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.यावर्षी जून ते ऑक्टोबर याकाळात निसर्ग वादळासह अनेकवेळा झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले. यावर्षी सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाचा मुक्काम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबला.
याकाळात झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील ६३,१७८ शेतकऱ्यांच्या ११,८१२.५७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेआठ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. या निधीतून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती.सुरूवातीला शासनाने जिरायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ६,८०० रुपये आणि बागायतीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रूपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोकणातील शेती ही प्रामुख्याने काही गुंठ्यांवर असल्याने भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे शासनाने ही रक्कम वाढवून जिरायतीसाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये आणि बागायतींसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रूपये एवढी केली.त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत एकूण ७ कोटी ९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचे वाटप सध्या सुरू आहे. आणखी ९ कोटी ५८ लाख रूपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांनी नुकसानाबाब ऑनलाईन तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे वाटपात अडचणी येत आहेत.खातेदार अनेकबाधित शेतकऱ्यांपैकी काहींचे वास्तव्य मुंबईत आहे. त्याचप्रमाणे सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अधिक खातेदार असल्याने भरपाई रकमेचे वाटप करण्यात अडचणी येत आहेत.