देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गीज्झकुट्ट पबत्ते बुद्धविहार ट्रस्ट संचलित आणि माता रमाई महिला मंडळ बौद्धजन भावकी स्थानिक व मुंबई यांच्यातर्फे खेड तालुक्यातील पोसरे गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तू तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले.
गृहोपयोगी साहित्य वाटप
आवाशी : माटुंगा दादर (पूर्व) येथील खालसा कॉलेजच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी गृहोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. माजी खासदार अनंत गीते यांच्या सहकार्यातून चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते व दळवटणे येथे या मदतीचे वाटप करण्यात आले. दळवटणेतील सुमारे ९० घरांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सीईटी सराव परीक्षा
खेड : घरडा फाऊंडेशन संचलित घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, लवेल आणि खेडमार्फत १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील महिन्यात राज्य शासनाकडून सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची तयारी, परीक्षेचा सराव, वेळेच नियोजन व्हावे म्हणून सीईटी सराव परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बीएससी ॲग्रो शिक्षण घेणाऱ्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी तालुक्यातील पालघड गवळीवाडा येथे शेतकऱ्यांना पशुसंवर्धन या विषयाविषयी मार्गदर्शन केले. पशुसंवर्धनासाठी जनावरांची निवड, दुधाळ गायींचे व वासरांचे संवर्धन, जनावरांचा आहार, लसीकरणाचे वेळापत्रक, आदींविषयी या शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
आदिवासी पाड्यावर मदत
खेड : रत्नागिरी जिल्हा सहकार्य ग्रुप, वापी यांच्यावतीने तालुक्यातील पूरग्रस्त गाव असलेल्या बोरघर आदिवासी पाडा येथे मदतकार्य करण्यात आले. यावेळी ग्रुपचे सदस्य विनोद कदम, रामनाथ भोसले, विनोद निकम, सचिन वेल्हे, बोरघरच्या सरपंच राधा बोरकर, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच माजी सरपंच हौसाबाई पवार उपस्थित होत्या.