असगोली : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे गुहागर तालुक्यातील सर्वप्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांगांच्या मुलांना तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ८४ विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केले. दिव्यांगांमध्ये शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने संस्थेतर्फे दरवर्षी मोफत वह्यांचे वाटप करण्यात येते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, संस्थेचे सल्लागार व सर्पमित्र प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, अभिषेक इंटरप्राईजेसचे मॅनेजर दीपक झगडे, ज्ञानेश्वर झगडे, सरचिटणीस सुनील रांजणे, खजिनदार सुनील मुकनाक तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी संस्थेचे ध्येय, उद्दिष्ट खूप मोठे आहे, ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करायला हवा, असे सांगितले. उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी संस्थेच्या उपक्रमाचे काैतुक केले. या कार्यक्रमाला योगेंद्र विचारे, मी प्रणाली महिला ओ. पी. सी. प्रायव्हेट लिमिटेड, वरवेली व पप्पा जीवन संजीवनी ट्रस्ट, मुंबई यांनी सहकार्य केले. तसेच अभिजित मारूती बनसोडे - चिपळूण यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त संस्थेला पाच हजारांची देणगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश अनगुडे यांनी केले तर सुनील रांजाणे यांनी आभार मानले.
ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अजून वह्या मिळालेल्या नाहीत, त्यांनी रविवार, दि. २१ जुलैै रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत संस्थेचे कार्यालय वरवेली, चिरेखाण फाटा येथे संपर्क साधावा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सल्लागार विनायक ओक व संचालक प्रवीण मोहिते तसेच अनिल जोशी, प्रकाश कांबळे, संतोष घुमे, राजेश खामकर, नीता पालशेतकर यांनी सहकार्य केले.