ग्रामपंचायतीत लसीकरण
देवरुख : कनकाडी ग्रामपंचायतीमध्ये विशेष लसीकरण मोहीम झाली. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. ५० ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. दुसरा डोस असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले होते.
रस्ता खचला
राजापूर : गेल्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये राजापूर-धारतळे मार्गावर शहरानजीकच्या हर्डी-रानतळे यादरम्यान रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून सात गावांकडे धावणाऱ्या एस.टी. बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
सरसकट कर्जमाफीची मागणी
रत्नागिरी : कोकणातील हापूस उत्पादनावर हवामानातील बदलामुळे परिणाम झाला असल्याने शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी, अशी मागणी पावस हापूस आंबा बागायतदार सहकारी संस्थेच्या सभेत करण्यात आली. विमा कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रश्न मार्गी
राजापूर : गेली अनेक वर्षे वादात सापडलेल्या करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून हे आरोग्य केंद्र करक-कारवली तिठा येथे होणार आहे. सात गावांच्या सरपंचांनी या जागेला ठरावासह मान्यता दिली आहे.
परताव्यासाठी आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यातील अन्नपदार्थ उत्पादकांना २०२०-२१ या चालूवर्षाचा परतावा भरण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. वेळेत परतावा भरावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आली आहे.
सैनिकांना राख्या
दापोली : येथील न. का. वराडकर कला व रा. वि. बेलोसे वाणिज्य शांतिलाल जैन विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागातर्फे खास सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी राख्या पाठविण्यात आल्या.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखांबरोबर काॅमर्स (अकाैंटिंग/फायनान्स) या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. १४ ऑगस्टपर्यंत इनहाऊस कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
साकव धोकादायक
देवरुख : सह्याद्री खोऱ्यातील वाडी-वस्तींना जोडणारे पूर्वीच्या काळात बनविण्यात आलेले साकव धोकादायक बनले असून, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील कारभाटले व अणदेरीला जोडणाऱ्या साकवासह अनेक साकव कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
एस.टी.ची शयनयान सेवा सुरू
चिपळूण : गेले काही दिवस बंद असलेल्या चिपळूण - पुणे मार्गावरील दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी बस सुरू केली असून, चिपळूण-पुणे-पिंपरी-चिंचवड ही शयनयान सेवा सुरू केली आहे. दोन्ही बसेस कोयना, पाटणमार्गे धावणार आहेत.