चिपळूण : कोविड रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूणतर्फे तालुक्यातील कोविड सेंटर पेढांबे व वहाळ फाटा हे कोविड केअर सेंटर व तालुकांतर्गत नऊ प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता वैद्यकीय साहित्याची मोफत मदत देण्यात आली. कोविड रुग्णांकरिता संघटनेने २ लाखांची वैद्यकीय सुविधा व औषधे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव जाधव यांच्याकडे दिली.
या साहित्यामध्ये वॉटर हिटर, कॉफी मग, ऑक्सिमीटर, थर्मलगन, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, मास्क, कफसिरप, व्हिटॅमिन सी टॅबलेट व अन्य औषधे यांसारख्या जवळपास दोन लाख रुपये किमतीच्या साहित्याची मदत करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांनी संघटनेचे कौतुक करत संघटनेने दिलेली मदत ही ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना नवसंजीवनी देईल, असे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव म्हणाल्या की, शिक्षकांनी कोविड महामारीच्या काळात आरोग्यमित्र, पोलीसमित्र व अन्य आरोग्ययंत्रणेला पूरक अशी कामे प्रामाणिकपणे व सामाजिक बांधिलकी म्हणून पार पाडली आहेत. संघटनेने दिलेली वैद्यकीय मदत ही प्रत्येक सामान्य कोविड रुग्णांना दिली जाईल, असे सांगितले. साहित्य वितरणावेळी सभापती रिया कांबळे, सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, राजू जाधव, संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शिक्षण समिती सदस्य संतोष कदम, विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, प्रकाश सावर्डेकर, प्रफुल्ल केळस्कर, तालुकाध्यक्ष राजेंद्र महाडिक, संचालक अजय गराटे, कार्याध्यक्ष राजेश सोहनी, कोषाध्यक्ष अविनाश भंडारी, महिला प्रमुख माधवी वारे, नरेश मोरे, दिलीप बुदर, विजय जगताप उपस्थित होते.