चिपळूण : तालुक्यातील बामणोली येथील ८ वाड्यांमधील गरीब व गरजूंना मुंबई येथील दीप जनसेवा समितीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बामणोली येथे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोना आपत्तीत गेली दोन वर्षे गरीब गरजू मजुरांचा रोजगार बुडाला. त्यांना दीप जनसेवा समितीचे प्रमुख सुनील साळुंखे यांनी मदतीचा हात दिला.
वाडीची स्वच्छता
दाभोळ : दापाेली तालुक्यातील दाभोळ पाटील वाडीतील शिवसाई मित्र मंडळ ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक उपक्रमांतर्गत विविध सेवाभावी उपक्रमांचे नियोजन करीत असते. या वर्षी त्यांनी गौरी-गणपती सणाअगोदर आपली वाडी व आजूबाजूचा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यात प्रामुख्याने सार्वजनिक विहीर, पिण्याच्या पाण्याची टाकी व तिच्या जवळचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
शौचालय बंदच
दापाेली : शहरातील एकमेव असलेले दापोली नगरपंचायतीचे सुलभ शौचालय गेले अनेक महिने बंद आहे. ते सुरू करण्यासाठी प्रशासन लक्ष देत नसल्याने दापोलीकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात बांधलेले शौचालय बंद असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. लवकरच प्रशासनाने नागरिकांची होणारी अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कारवाई करा
लांजा : सोशल मीडियावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी काही समाजकंटकांनी विपरीत मजकूर लिहिला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसे निवेदन लांजा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. सामाजिक योगदानाचा काहींना विसर पडला म्हणूनच सोशल मीडियावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत लिखाण करण्यात आले आहे.
मदत वाटप
खेड : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे व शिवसेना युवासेना शाखा कोतवली यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात गरजू लोकांना मदत वाटप करण्यात आली. तालुक्यातील कोतवली परिसरातील १० गरजू कुटुंबाना धान्य किट तर १७ कुटुंबांना चादर व टाॅवेल वाटप करण्यात आले.
लसीकरण पूर्ण
पावस : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे गेले दीड वर्ष ऑनलाइन अध्यापन सुरू झाले आहे. कोरोनामुक्त गावातून शाळा सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ६० शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले असून ५,१२१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. लवकरच शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल.
नागरिक हैराण
मंडणगड : गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. कोणतीही सूचना न देता अचानक होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे तालुकावासीय पुरते हैराण झाले आहेत. रत्नागिरीतील काही तालुक्यांत अतिवृष्टीही झाली. या काळात खंडित झालेला वीजपुरवठा अद्याप सुरळीत करण्यात आलेला नाही.
नवे मुख्याधिकारी
दापोली : दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी राजापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ढेकळे यांनी मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ढेकळे यांनी कुडाळ येथे सेवा बजावली होती. त्यानंतर ते राजापूर येथे सेवा बजावत होते. तेथून ते दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारपदी रुजू झाले आहेत.