चिपळूण : शहरातील चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंचतर्फे समाजातील महिलांना १८ रोजी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. गोवळकोट रोड येथील इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी ११ वाजता हे वाटप होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार आहे.
ग्रामीण भागात कोरोना
दापोली : दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने सर्वत्र पसरू लागला आहे. शहरासह आता ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. यानंतरही उन्हाळी हंगामात मुुंबईकर गावाला दाखल होणार असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकच भर पडणार आहे.
गरजूंना मदतीचा हात
आवाशी : लॉकडाऊन कालावधीत हातावर पोट असलेल्या गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी रिलीफ फाऊंडेशन पुन्हा सरसावले आहे. शहरासह तालुक्यातील १५० कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असून या प्रक्रियेस नुकताच प्रारंभ झाला आहे.
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
दापोली : तालुक्यातील आसूद येथील गुरववाडी सभागृहात गुरुवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. वालावलकर रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय डेरवण आणि त्रिवेणी संगम ग्रुप आसूद यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते.
टँकरने पाणीपुरवठा
खेड : तालुक्यातील खोपी रामजीवाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मैलोनमैल पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टँकरसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर पाण्याचा टँकर सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पीपीई किटचे वाटप
मंडणगड : मंडणगड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन माजी आमदार संजय कदम यांच्यातर्फे येथील नगरपंचायतीला पीपीई किट तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. येथील रिक्षा संघटनेलाही मास्कचे वाटप करण्यात आले. कदम यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील शाळांना ६,५०० मास्क देण्यात आले.
मेर्वीत आंबेडकर जयंती
पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक संतोष कडवईकर तसेच इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही आयोजित केल्या होत्या.
खाद्यतेल महागले
लांजा : वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या जनतेच्या हातातील काम हिरावले गेले आहे. त्यातच आता महागाईने डोके वर काढले आहे. मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर उत्तरोत्तर वाढू लागले आहेत. या महिन्यात खाद्यतेलाच्या दरात २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.
रिक्षा व्यवसाय अडचणीत
राजापूर : लॉकडाऊनचा फटका विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. गेल्या वर्षापासून रिक्षा व्यावसायिकांनाही लॉकडाऊनमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. बँकांच्या कर्जाचे हप्ते भरताना हे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. त्याचबरोबर शासनाने विमा परमीट पासिंगसह अन्य शुल्कात वाढ केल्याने हे व्यावसायिक हतबल झाले आहेत.
उद्योग क्षेत्राला फटका
रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत सुरू झालेल्या उद्योग क्षेत्राला पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊनचा फटका बसला आहे. उत्पादन थांबल्याने हैराण झालेल्या उद्योजकांना आता पुन्हा या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. उद्योग बंद असला तरी कामगारांचे वेतन द्यावे लागणार असल्याने हा सगळा खर्च कसा करायचा ही विवंचना सतावत आहे.