देवरुख : संगमेश्वर तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सामाजिक बांधीलकी जपत देवरुख येथील कोविड सेंटरला गुरुवारी उपयोगी वस्तूंचे वाटप सकाळी करण्यात आले.
तालुक्याचे सभापती जयसिंग माने व संघटनेचे अध्यक्ष अभिजित कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख कोविड सेंटरला उपयुक्त असे एन ९५ मास्क, ग्लोव्हज, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी गोळ्या आदी साहित्य तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांच्याकडे संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण जागुष्टे, मुबीन मालगुंडकर, मयूर खरात व विशाल भालेकर यांनी दिले.
कोविड काळात तालुक्यातील सर्व केमिस्ट अविरत आरोग्य सेवा देत असताना सामाजिक भान ठेवून ही मदत दिल्यामुळे सभापती जयसिंग माने यांनी संघटनेचे कौतुक केले आहे. तसेच जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा संगमेश्वर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मदतीस पुढे सरसावते. तसेच सध्याच्या कोरोना काळातसुद्धा सर्व व्यावसायिक अविरत आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेत केमिस्ट वर्गाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे सभापती माने यांनी केली आहे.