रत्नागिरी : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव कृती आराखडा तर नंतर जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
२२ जुलै ते ७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात आणि गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी हे अभियान या कालावधीत विशेष करून राबवण्यात येत आहे. सदर अभियान कोविडच्या पार्श्वभूमीवर कोबो कलेक्ट या डिजिटल माध्यमाचा उपयोग करून जिल्हा, तालुका व गावपातळीवर करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने गाव कृती आराखड्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गाव पातळीवर संकलित झालेली माहिती व आकडेवारी डिजिटल माध्यमातून भरुन पुढे पाठवून जमा झालेल्या माहितीवर प्रक्रिया करून गाव कृती आराखडा निर्मिती करून अंतिम आराखडा १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरीकरिता ठेवण्यात येणार आहे.
जलजीवन मिशन पाणी व स्वच्छता विभागाच्या सहाय्याने कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एण्ट्री ऑपरेटर, जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार यांना झुम ॲपद्वारे गाव कृती आराखडा माहिती संकलन मोहीम राबविण्याची प्रक्रिया कोबो टुलद्वारे माहिती अपलोड याबाबत प्रशिक्षण देण्यात आले, तसेच तालुका पातळीवरील सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडून ३१ जुलैपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गाव कृती आराखड्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलरक्षक/पंप ऑपरेटर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.