रत्नागिरी : शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.राज्य सरकारने महाराष्ट्रात शिवभोजन केंद्राद्वारे सामान्य व्यक्तींना १० रूपयांत पूर्ण जेवण मिळावे, या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. कोरोना काळात ही थाळी ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात हातातील काम थांबलेल्या कामगारांसह अन्य आर्थिक दुर्बल घटकांना या शिवभोजन थाळीचा आधार मिळत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत या थाळीचा दर ५ रुपये एवढाच ठेवण्यात आला आहे.मात्र, राज्यात अनेक भागात जादा थाळ्या दाखवून त्यातून काहींनी नफा काढल्याचे निदर्शनास आले आहे. शिवभोजन घेणाऱ्याच्या अपलोड केलेल्या फोटोवरून दरदिवशी थाळ्यांच्या विक्रीची संख्या समजते. मात्र, काही केंद्रांवर एकाच व्यक्तीचे, त्याच पोषाखातील एकाच दिवसाचे फोटो अनेक वेळा अपलोड केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही केंद्रांत कमी झालेल्या थाळ्यांची संख्या वाढवून दाखवून त्यातून नफा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व जिल्ह्यांना सर्व शिवभोजन केंद्रांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांमधील थाळ्यांच्या संख्येवर आता बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील या २२ केंद्रांमध्ये २६५० थाळ्यांची क्षमता आहे. जिल्ह्याला ३ हजार थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. अजूनही काही ठिकाणे प्रस्तावित असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 2:32 PM
shiv bhojnalaya, ratnagirinews शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.
ठळक मुद्देशिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजरजिल्ह्यातील २२ केंद्रांमध्ये २६५० थाळ्यांची क्षमता