रत्नागिरी : मुळातच कमी वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे समस्येच्या गर्तेत सापडलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महिन्याभरात रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण होण्याचा तिसरा प्रकार समोर आला आहे. पहिली दोन प्रकरणे समज देऊन मिटविण्यात आली; मात्र तिसऱ्या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यानेच पोलिस ठाण्यात धाव घेतल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वातावरण गढूळले आहे.काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समस्या वाढल्या आहेत. रुग्णांना चांगली सोय नाही, मेणबत्तीच्या प्रकाशात होणारे उपचार, अपुऱ्या खाटा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांची अल्पसंख्या या गोष्टींमुळे जिल्हा शासकीय रुग्णालय मुळातच चर्चेत आहे. त्यात आता वैद्यकीय अधिकारी आणि वॉर्डबॉय यांच्यात मारहाणीचे प्रकार घडू लागले आहेत.गेल्या दोन महिन्यांत एका वैद्यकीय अधिकाऱ्याने एकाच वार्डबॉयला दोनवेळा मारले असल्याचे समोर आले होते. त्या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्याला समज देऊन प्रकरण मिटविण्यात आले. आता मारहाणीचे तिसरे प्रकरण मात्र पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.प्रशांत पवार या कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत आपल्याला ठार मारण्याची धमकी देऊन कामात अडथळा केल्याची तक्रार डॉ. सुरेंद्र आनंदा सूर्यगंध यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.१७ जानेवारीला रुग्णालयाचा कर्मचारी प्रशांत पवार याचा अपघात झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपण त्याला तपासून मद्यपान केले आहेस का, असे विचारले. त्यावेळी प्रशांत पवार याने आपल्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला, अशी तक्रार डॉ. सूर्यगंध यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. प्रशांत पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चित्रा मढवी या करीत आहेत.दरम्यान, डॉ. सूर्यगंध यांनी प्रशांतला मारहाण केली असल्याची तक्रार प्रशांतच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडे केली आहे. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटून कारवाईची मागणीही केली आहे. आता प्रशांतविरोधात गुन्हा दाखल झाल्याने वातावरण आणखी बिघडले आहे. (वार्ताहर)
जिल्हा रुग्णालयातील वाद पोलिस ठाण्यापर्यंत
By admin | Published: January 19, 2017 11:13 PM