रत्नागिरी : जिल्ह्याने मार्च महिन्याच्याअखेरीस ११ हजारांचा टप्पा ओलांडला असून, बुधवारी नवीन ८७ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआर चाचणीत ४३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत ४४ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. यापैकी चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण आहेत. केवळ मार्च महिन्यात जिल्हयात १०५५ रुग्णांची नोंद झाली आहे.
होळीच्या सणासाठी कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईहून अनेक चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्या ८७ रुग्णांची भर पडली. यात रत्नागिरी आणि खेड प्रत्येकी १३, दापोली १६, चिपळूण ३२, गुहागर ४, संगमेश्वर ६, लांजा २ आणि राजापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे. मंडणगडात एकही रुग्णाची नोंद नाही. कोरोनामुक्त झालेल्या ३० रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. ८६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत ११,०२९ झाली आहे. १०,१०५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत. ३७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १,००,२८६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७२ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३७६ असून, मृत्यू दरात काहीशी घट होत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्या तुलनेत बरे झालेल्यांची टक्केवारी ९४ टक्क्यांवरून ९१.६२ टक्के इतकी दिसत आहे.