रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. शिमगोत्सवात ही संख्या वाढू लागल्याने आता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सुचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली असून, सध्या ही प्रयोगशाळा २४ तास कार्यरत आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात सुमारे ८०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ एप्रिलअखेर ११ हजार १०७ इतकी झाली आहे. कमी झालेली रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. बहुतांश नागरिक मास्क आणि सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना वेगाने पसरू लागला आहे. कोकणातील मोठा उत्सव म्हणजे शिमगा. होळीच्या सणासाठी कोरोनाचे ‘हाॅटस्पाॅट’ असलेल्या मुंबई- पुणे यांसारख्या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. या वाढत्या संख्येने जिल्ह्याची चिंता वाढली असून, आरोग्य यंत्रणेची पुन्हा रात्रंदिवस धावपळ सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी येणार, त्यामुळे रुग्ण वाढणार, ही शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत होती. खासगी वाहने तसेच ट्रॅव्हल्र्समधून येणाऱ्या नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या सर्च नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते; मात्र नागरिकांकडून त्याबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. त्यामुळे होळीसाठी कोकण रेल्वे, तसेच एस.टी. बस, खासगी गाड्यांमधून आलेले नागरिक चाचणी न करताच घरी परतल्याने जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, १५ दिवसांत रुग्णसंख्या ८०० पेक्षा अधिक झाली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी कोकण रेल्वेने, बसने येणाऱ्या लोकांची स्थानकावर सुरुवातीला चाचणी करण्यात येत होती; मात्र होळीच्या काळात कुठल्याही स्थानकावर चाचणी झाली नाही. त्यामुळेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता जिल्हा रुग्णालयात दर दिवशीच ११०० ते १३०० पर्यंत चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची कोरोना चाचणी प्रयोगशाळा आता २४ तास सुरू ठेवण्यात आली आहे.
कोटसाठी
कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता चाचण्यांची संख्या वाढविणे क्रमप्राप्त ठरले आहे. ॲंटिजन चाचणीत केवळ ३० टक्के इतकीच विश्वासार्हता असल्याने खात्रीशीर असलेल्या आरटीपीसीआर चाचणींवर अधिक भर देण्यात आला आहे. सध्या दिवसाला १२०० ते १३०० पर्यंत चाचण्या होत आहेत. त्यासाठी कोरोना चाचणी प्रयाेगशाळा २४ तास सुरू ठेवावी लागत आहे.
- डाॅ. संघमित्रा फुले - गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.