रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाच्या सुयोग्य नियोजनासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम यशस्वी पार पडली.
यावेळी आरोग्य संचालनालयाकडे पाठविण्यात आलेल्या यादीतील नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात परिचारिका, डॉक्टर्स तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आरोग्य कर्मचारी आरती कदम यांना या रंगीत तालमीच्या लसीकरणाचा सर्वप्रथम मान मिळाला.सकाळी ८ ते ४ या वेळेत ही रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हा रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय आणि हातखंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली. यासाठी पाच जणांची टीम तयार करण्यात आली होती.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रकांत शेरखाने, डॉ.अर्जुन सुतार तसेच लसीकरण विभागातील जान्हवी दुधवडकर, भारगे, मिशाळे यांनी ही तालीम यशस्वी केली.लसीकरणादरम्यान प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे तसेच जिल्हा पोलीस उपअधीक्षक (गृह) शिवाजी पाटील यांनी भेट देत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत शेरखाने यांच्याकडून लसीकरणाविषयी माहिती घेतली. प्रत्यक्षात होणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून योग्य प्रकारे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांनी दिली.