रत्नागिरी : पक्षांकडून सर्व प्रभागांमधील उमेदवार निश्चित झाले. अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म वितरित झाले. आता युती करून माघार घ्यायला सांगायचे कोणाला, समजूत कोणाकोणाची घालणार आणि मुख्य म्हणजे युतीतल्या युतीमध्येच पक्षांतर केलेल्यांना काय समजावणार, असे प्रश्न शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांसमोर असल्याने राज्यस्तरावर युतीची घोषणा झाली असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि भाजपची युती होणे अशक्य असल्याचे मत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. वेळ निघून गेल्यानंतर झालेली युतीची घोषणा ही केवळ दिखाव्यासाठीच आहे की काय, असा प्रश्नही दोन्ही पक्षांमधून पुढे येत आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची गुरूवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि त्यानंतर खासदार संजय राऊत व रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राज्यात शिवसेना-भाजप युतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यस्तरावरून युतीची घोषणा झाली असली, तरी जिल्हास्तरावर मात्र त्याबाबत फारसा उत्साह नाही. मुळात गेले काही दिवस दोन्ही पक्षांमध्ये मोठी ओढाताण सुरू आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसपेक्षा एकमेकांविरूद्धच लढण्याची ईर्षा अधिक आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे ओढण्यासाठी गेला बराच काळ जोरदार प्रयत्न केले आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेतून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेल्यांची संख्या बरीच आहे. युती झाली तर या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय समजावणार, हा मोठा प्रश्न आहे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी ३0 जागांची निवडणूक होत असताना ९0-१00 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे. कोणाकोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न आधीच या पक्षांसमोर आहे. जर युती झाली तर १५-१५ जागा देणार तरी कोणाला, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना आता युती करण्यात स्वारस्य नाही, असाच मुद्दा दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून मांडला जात आहे. त्यामुळे राज्यस्तरावरून घोषणा झाली असली, तरी युती होण्याची शक्यता नाही, असे ठाम मत दोन्ही बाजूंचे नेते व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी) अजूनही पक्षांतरे सुरूच उमेदवारी मिळाली नाही या कारणास्तव अजूनही शिवसेनेतून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत अशा पक्षांतरांना जिल्ह्यात वेग आला आहे. राजापूरपासून दापोलीपर्यंत ही पक्षांतरे सुरू आहेत. उद्या शनिवारी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यावेळी आणखी काही पक्षांतरे समोर येण्याची शक्यता आहे. बाबा बार्इंग, संजय पुनसकर यांच्यासह अनेकजण भाजपमधून शिवसेनेत गेले आहेत. शिवसेनेतील काहीजण उद्या भाजपमध्ये जाण्याची मोठी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युतीची शक्यता कमीच आहे. नगराध्यक्ष उमेदवारी द्यायची कोणाला? स्थानिक पातळीवर युती झाली तर उमेदवारी शिवसेनेला की भाजपला हाच प्रश्न मोठा असेल. याआधी युतीने निवडणूक लढवल्यानंतर पहिले सव्वा वर्ष शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद होते. त्यानंतर हे पद भाजपकडे गेले आणि सव्वा वर्षानंतर भाजपने हे पद सोडलेच नाही. त्यामुळे आता शिवसेना-भाजपमधील वादाची दरी खूपच रूंदावली आहे. त्यामुळे राज्यस्तरावर दोन्ही पक्षांनी काहीही निर्णय घेतला तरी स्थानिक पातळीवर युती होणे अवघड आहे.
जिल्हास्तरावर युती अशक्यच
By admin | Published: October 28, 2016 11:42 PM