फोटो ओळ :
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त पावस येथील सखाराम पावसकर कुटुंबीयांना संघटनेचे संस्थापक दत्तात्रेय महाडिक, अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष नीलेश जगताप, सचिव राजेश कळंबटे, खजिनदार विशाल मोरे उपस्थित होते.
...........................
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त पावस येथील सखाराम पावसकर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. त्यांच्या घरकुलाच्या प्रलंबित प्रस्तावाचा पाठपुरावा शासनस्तरावर करण्याचे आश्वासनही संघटनेतर्फेे देण्यात आले आहे.
पावस येथील सखाराम पावसकर यांचा घरकुलाचा प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडून आहे. त्यासाठी पावसकर यांना सातत्याने जिल्हा परिषदेमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत. जन्मत:च गतिमंद असलेल्या मुलीचे दु:ख पचवावे लागलेल्या सखाराम पावसकर यांना मोठ्या मुलीचा संसार सुखाने सुरू असतानाच तिच्या मृत्यूचा धक्काही सोसावा लागला. त्यातच दोन चिमुरड्या नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली.
काळाच्या धक्क्याने खचून न जाता पावस येथे सखाराम पावसकर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गतिमंद मुलीला एक दिवसही सोडून दोघांपैकी एकाला बाजूला जाता येत नाही. सोळा व आठ वर्षाची नातवंडे असून त्यांचा सांभाळ करीत आहेत. एका नातवंडाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे स्वप्न आजी पद्मिनी यांचे असले तरी आर्थिक स्थिती आड येत आहे.
सहा बाय दहाच्या खोलीत पावसकर कुटुंब वास्तव्य करीत आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव अद्याप जिल्हा परिषदेकडे पडून आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. कागदपत्रांचे घोडे अडकले आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक दत्तात्रेय महाडिक, अध्यक्ष राजेद्र चव्हाण, उपाध्यक्ष नीलेश जगताप, सचिव राजेश कळंबटे, खजिनदार विशाल मोरे, ज्येष्ठ सदस्य विजय पाडावे, राजेश चव्हाण, सचिन बोरकर, मोरेश्वर आंबुलकर, राकेश गुडेकर, तन्मय दाते आदी उपस्थित होते.