रत्नागिरी : आगामी निवडणुकांवर लक्ष ठेऊन मोदी सरकारने प्रधानमंत्री जन - धन योजनेची घोषणा करून तिच्या अंमलबजावणीला प्रारंभ केला असला तरी तिचे निकष स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत व्यावसायिक बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक तसेच पोस्ट कार्यालये यांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील एकूण ३१२ विविध बँकांकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, या सर्वच बँकांनी विविध कामांसाठी ग्रामीण नागरिकांना बँक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन खाते खोलावे लागणार आहे की आधी आहे त्याच खात्यांवर त्यांना हे फायदे मिळणार आहेत, याबाबत कोणतेच निकष निश्चित झालेले नाहीत. निवडणुका लक्षात घेऊन घाईघाईत सुरू केलेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेचे निकष स्पष्टच झालेले नसल्याने त्याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. याबाबत आता सर्व बँकांच्या मध्यवर्ती बँकेकडून आता प्रत्येक ग्रामीण भागात नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आता किती लोकांनी अद्याप कुठल्याच बँकेत खाते उघडलेले नाही, हे कळण्यास मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी अगदी दुर्गम भागात प्रतिनिधींना पाठवून हे सर्वेक्षण करावे लागणार असल्याने या सर्व बँकांची डोकेदुखी आता वाढली आहे. आता या सर्वच बँकांच्या मुख्य कार्यालयाकडून याबाबतचे निकष स्पष्ट करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)
‘जन धन योजने’बाबत जिल्ह्यातील बँकांमध्ये संभ्रम
By admin | Published: September 12, 2014 11:35 PM