चिपळूण : दिव्यांगांना रेल्वे प्रवास सवलत ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यासाठी दि.३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्वामी विवेकानंद सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी अन्य सुविधाही दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगितले.दि.३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त गेली २ वर्षे येथे तहसीलदार देसाई विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन दिव्यांगांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यावर्षीही तहसील कार्यालय, अपंग सेवा संस्था, आरोग्य विभाग यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात कामथे रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ञ व वैद्यकिय पथक दिव्यांगाची रेल्वे प्रवास सवलत ओळखपत्रासाठी तपासणी करणार आहेत. येथे कोकण रेल्वेचे क्षेत्रिय प्रबंधक या ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेणार आहेत.या शिबिराचे उद्घाटन आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप-भोसले, सभापती पूजा निकम, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष अनंत पवार, निराधार फाऊंडेशनचे सचिव नाझिम अफवारे उपस्थित राहणार आहेत.