रत्नागिरी : दिव्यांगांना मोफत व नियमित धान्य एकत्र द्यावे, अशी मागणी येथील आस्था सोशल फाउंडेशनने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जून महिन्याचे धान्य दिव्यांगांना एकत्रित देण्याविषयी सूचना केल्या आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरिता, राज्यात टाळेबंदी तसेच रात्रीच्या कालावधीसाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक साहाय्याअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना नियमित आणि मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. दिव्यांगांना मोफत व नियमित धान्य वेगवेगळ्या वेळेस देण्यात येते. ग्रामीण भागात रेशन दुकाने घरापासून अंतरावर असल्यामुळे दिव्यांगांना रेशन दुकानावर जाण्यासाठी दोन खेपा घालण्यासाठी श्रम, पैसा व वेळ यांचा अपव्यय होतो. या प्रकरणी आस्था सोशल फाउंडेशनच्या आस्था दिव्यांग हेल्पलाईनकडे काही दिवसांपूर्वी दिव्यांगांनी तक्रार नोंदविली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दिव्यांगांना दोन वेळा, तर काही वेळा मशीन बंद असल्यास तीन ते चार वेळा जीव धोक्यात घालून धान्य आणण्यासाठी जावे लागत आहे. ग्रामीण भागात दुकाने व रस्तेदेखील दिव्यांगांसाठी सुलभ नाहीत. त्यामुळे दिव्यांगांना नियमित व मोफत असे दोन्ही योजनांचे धान्य एकाच वेळेस व प्राधान्याने देण्यात यावे (रांगेत उभे करू नये), अशी विनंती आस्था सोशल फाउंडेशनने जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी काळुसे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जून महिन्याचे धान्य दिव्यांगांना एकत्रित देण्याविषयी सूचना केल्या आहेत. त्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात या लॉकडाऊनच्या काळात दिलासा मिळणार आहे. मात्र, त्यासाठी सर्व तालुका पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदारांनी धान्य उचल करताना त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
या पत्राची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने दिव्यांगांनीही आपल्या तालुक्यातील पुरवठा शाखा व रेशन दुकानदारांकडे विचारणा करावी, असे आवाहन आस्था दिव्यांग हेल्पलाईनच्या सुरेखा पाथरे, संकेत चाळके, कल्पेश साखरकर यांनी केले आहे.