आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २४ : दीप अमावास्येचे मानवी आयुष्यातील महत्त्व सांगण्याचा प्रयत्न परशुरामपंत अभ्यंकर विद्यांमदिर गेली अनेक वर्षे करत आहे. दगडांच्या घर्षणातून अग्नी निर्माण झाला. हा अग्नी वेगवेगळ्या रुपात वापरण्यात येतो. ही सर्व उपकरणे आकर्षक पद्धतीने परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात मांडण्यात आल्यानंतर त्यांचे पूजनही करण्यात आले. आदीमानव दगडांच्या घर्षणातून अग्नी निर्माण करत असे. उत्क्रांतीनंतर हाच अग्नी वेगवेगळ्या दिव्यांच्या रूपामध्ये बदलू लागला. समई, करवंटीचा दिवा, पंचारत, काडवाती, पीठाचे दिवे, फुलवातीचे निरांजन, पणती, त्रिपूर, कंदील, ज्ञानदीप, मशाल, बत्ती असे दिव्यांचे अनेक प्रकार या प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
तसेच चार्जिंगचे बल्ब, विद्युत माळा, ट्यूबलाईट असे आधुनिक प्रकारही यात मांडण्यात आले होते. दिव्यांच्या अमावास्येला दीप पूजन महत्त्वाचे असते. परंतु अलीकडे गटारी अमावास्या अशी वाईट पद्धत सर्वत्र पाहायला मिळते. त्याऐवजी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना दिव्यांच्या अमावास्येचे व अग्नीचे रूप समजावे या हेतूने हे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते.
या कार्यक्रमाला दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, शाळेचे व्यवस्थापक दिलीप भातडे, कार्यकारिणी सदस्य जयंत प्रभुदेसाई, मुख्याध्यापक, सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आनंदीबाई अभ्यंकर बालविद्यामंदिरातही विद्यार्थ्यांना गोष्ट सांगून दिव्यांचे महत्त्व विषद करण्यात आले. मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली पणत्या, मेणबत्ती, समई प्रज्वलित करून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व बालदोस्तांनी दिव्याला नमस्कार केला.