आदर्की : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘आव्वाज गावचा..नाय डॉल्बीचा’ या चळवळीला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे पोलिस प्रशासन न्यायालयाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करत असताना दुसरीकडे विविध गावच्या ग्रामसभांमध्येही ‘डॉल्बी बंदी’चा नारा घुमू लागला आहे. फलटण तालुक्यातील बिबी, कोऱ्हाळे आणि मुळीकवाडी या गावांनीही आता दारूबंदीसह डॉल्बी बंदीचा एकमुखी निर्णय ग्रामसभेत घेतला आहे.गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सवशांततेत साजरा व्हावा यासाठी ‘लोकमत’ने ‘आव्वाज गावचा..नाय डॉल्बीचा’ ही चळवळ सुरू केली असून, या चळवळीला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. आजअखेर अनेक गावांनी पुढाकार घेऊन गावातून डॉल्बी कायमची हद्दपार केली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी नियोजन बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये अनेक मंडळांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. फलटण तालुक्यातील बिबी, कोऱ्हाळे आणि मुळीकवाडी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत डॉल्बी बंदीसह दारूबंदीचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. (वार्ताहर)डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. डॉल्बीचे फायदे कमी मात्र तोटे सांगावे तितके कमीच आहेत. डॉल्बीच्या आवाजामुळे जिल्ह्यात आजअखेर अनेक वाईट घटना घडल्या आहेत. असे प्रसंग टाळण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. डॉल्बीची गंभीरता ओळखून ग्रामसभेत डॉल्बी बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.- नवनाथ बोबडे,उपसरपंच, बिबीडॉल्बीच्या आवाजामुळे अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. तसेच ध्वनीप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. कोऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत डॉल्बी बंदीचा विषय मांडण्यात आला. या विषयाला सर्वांनी सहमती दर्शवली. आता गावातून डॉल्बीला हद्दपार करण्यात आले आहे. डॉल्बी बंदीसह दारूबंदीचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.- सीमा शिंदे, सरपंच, कोऱ्हाळेमुळीकवाडी गाव निर्मल व तंटामुक्त ग्राम आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत निघणाऱ्या मिरवणुका, लग्न सोहळे आदींमध्ये वाजविल्या जाणाऱ्या डॉल्बीमुळे विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत ‘एक गाव एक गणपती’चा निर्णय घेण्यात आला असून दारूबंदी, जुगारबंदीसह डॉल्बी बंदीचा ऐतिहासिक निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला आहे.- लहुराज मुळीक,उपसरपंच, मुळीकवाडी
फलटण तालुक्यातील तीन गावांतून ‘डॉल्बी’ला दे धक्का
By admin | Published: August 20, 2016 9:58 PM