लाेकमत न्यूज नेटवर्क
जाकादेवी : आरोग्य केंद्रात बाहेरच्या व्यक्तीने येऊन कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास संधी देऊ नका़ शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे परिसरातील लाभार्थी नागरिकांना लसीकरणाची माहिती गावा-गावांतील सरपंच, पोलीस पाटील, सेवाभावी नागरिक यांच्याद्वारे अनेकांपर्यंत कळवावी, जेणेकरून या लसीकरणाचा अनेकांना लाभ मिळेल, यासाठी आरोग्य विभाग व लसीकरण पथकानेही सदैव प्रयत्नशील रहावे, असे राठोड यांनी आवाहन केले.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दापाेलीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी गुरुवारी भेट देऊन लसीकरण केंद्राची पाहणी करून मार्गदर्शक सूचना देऊन लसीकरण केंद्राच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़
जाकादेवी कोरोना लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर डॉ. राठोड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लसीकरण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कोरोना लसीकरण कार्यवाहीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे, पर्यवेक्षिका सुषमा आचरेकर, पोलीस पाटील प्रकाश जाधव, खालगावचे बीट अंमलदार, हेडकॉन्स्टेबल किशोर जोशी, पोलीस मित्र संतोष पवार, शरद माने, शिक्षक विलास पानसरे, मंगेश भारती तसेच आरोग्य सेविका जान्हवी चव्हाण, मीनाक्षी आग्रे यांसह पथकातील व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
कोराेना लसीकरण मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनानुसार पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व लसीकरण केंद्रावर देण्यात आलेले शासकीय कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे काम करण्याचे आवाहन राठाेड यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे यांनी राठोड यांना लसीकरणाबाबत माहिती दिली़
-------------------------------------
जाकादेवी आरोग्य केंद्रातील लसीकरणाच्या केंद्राला उपविभागीय पाेलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी भेट दिली़ यावेळी बीट अंमलदार किशोर जोशी, डॉ. महेश मोरताडे, पर्यवेक्षिका सुषमा आचरेकर, संतोष पवार उपस्थित हाेते़