कणकवली : कोकणात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजाच्या परिस्थितीचा फायदा उठवत काही मंडळी आपला स्वार्थ साधत आहेत. परंतु यापुढे कुणाच्याही क्षणीक आमिषाला बळी न पडता समाजोन्नतीचा झेंडा हाती घेऊन एकजुटीने कार्यरत रहा, असे आवाहन धोंडू पाष्टे यांनी केले.कणकवली तालुका कुणबी समाजाच्यावतीने एकता मेळाव्याचे आयोजन फोंडाघाट येथील शांताराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शाम भोवड, सुरेश भितम, रमेश गुंडये, सुरेश रांबाडे, संजय धुमक, एकनाथ पेंटकुलकर, मंगेश धुमाळ, रमेश जोगळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना धोंडू पाष्टे म्हणाले, आपला स्वाभिमान जागवत कुणबी समाज संघटीत होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपली प्रगती साधण्यासाठी आपापसातील तंटे बाजूला ठेवून एकजुटीसाठी प्रज्वलीत झालेली सामाजिक बांधिलकीची ज्योत समाजबांधवांनी यापुढेही कायम ठेवावी. त्यातूनच सर्वांगीण उन्नती साधता येईल.शिवराम जाधव म्हणाले, कुणबी बांधवांनी आता फक्त कष्टाचीच कामे करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रगतशील शेतकरी बनावे. शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन आपली उन्नती साधा. समाजाच्या प्रगतीसाठी तरूणांचे योगदान मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. आता आरक्षणासाठी भांडायचे नाही तर लढायचे आहे. शासनकर्ते शामराव पेजेंसारख्यांचा अहवाल दडवून आरक्षणात आपल्यावर अन्याय करीत आहेत. कुणबी समाजाचा अभ्यास करून शासनाने आरक्षण दिले पाहिजे होते. मात्र, राजकारण्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. आमच्या मतावर पोळी भाजणाऱ्या नेत्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मातीशी नाते असणाऱ्या व खऱ्या अर्थाने जनतेचा पोशिंदा असलेल्या कुणबी बांधवांना अद्याप न्याय मिळाला नसला तरी आता समाज संघटीत होत असल्याने ती वेळ दूर नाही. यावेळी विलास नावले, मंगेश धुमाळ, शाम भोवड, रमेश जोगळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय डोंगरे यांनी तर प्रास्ताविक सुरेश रांबाडे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मंगेश धुमाळ, भाई नराम, विजय सोलकर, भाऊ भिसे, विजय डोंगरे, रविंद्र सोलकर, संदीप शिवगण, संजय शिर्के यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका
By admin | Published: August 28, 2014 9:06 PM