रत्नागिरी : २० ते २२ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली. जिल्ह्यात चिपळूण आणि खेड या तालुक्यांना याचा अधिक फटका बसला. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झालेल्या या तालुक्यांमध्ये तातडीने मदतकार्य करण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असतानाच पहिल्या दिवसापासून विविध मंत्र्यांचे दौरे सुरू झाल्याने दौरे सांभाळायचे की काम करायचे, या प्रश्नाने हैराण झाली आहे.
बुधवारी रात्रीपासून चिपळुणात अतिवृष्टी, वाशिष्ठीला आलेला पूर यामुळे महाप्रलयाचे स्वरूप निर्माण झाले. खेड, राजापूर आणि रत्नागिरी आदी तालुक्यांनाही पुराचा फटका बसला. सर्वाधिक नुकसान चिपळूणमध्ये झाले. चिपळूण आणि खेड तालुक्यांमध्ये महापुराप्रमाणेच गावांमध्ये दरड कोसळून अनेक बळी गेले. बुधवारी रात्रीपासून बचाव कार्यात प्रशासनाच्या विविध यंत्रणा गुंतल्या आहेत. आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जलदगतीने पंचनामे करण्याचे नियोजन सुरू असतानाच दुसऱ्या दिवसांपासून विविध मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत.
गुरुवारी पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत रत्नागिरीत होते. मध्यरात्रीपासून चिपळुणात पुराचा हाहाकार उडाला असूनही जिल्हा प्रशासनाच्या बैठका दुपारपर्यंत सुरूच होत्या. त्यामुळे गुरुवारी सकाळीच पूरग्रस्तांच्या बचावाचे काम तातडीने होणे गरजेचे असतानाही कुठलीच यंत्रणा बचावकार्यासाठी पोहोचू शकली नाही. त्यामुळे स्थानिकांनीच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. उशिरा पोहोचलेल्या प्रशासकीय यंत्रणेने त्यानंतरही मदतकार्याला सुरुवात केली; परंतु पूर ओसरल्यानंतर पुन्हा राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पालकमंत्री अनिल परब, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि गुरुवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला.
सध्या चिपळूण, खेडमध्ये पुराने चिखल माजला आहे. तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची गरज असल्याने प्रशासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्य करत असतानाच पहिल्या दिवसांपासून सुरू झालेल्या या राजकीय दाैऱ्यांमुळे त्यांचेही नियोजन करताना या यंत्रणा मेटाकुटीस येत आहेत. अन्य कर्मचाऱ्यांबरोबरच अपुरे पोलीसबळही वेठीला लागत आहे. त्यामुळे मदतकार्याबरोबरच पंचनामे करताना अडचणी येत आहेत. पूरग्रस्तांना मदतीपेक्षा आढावा बैठकाच अधिक होत असल्याने मदतकार्य बाजूला रहात आहे. अधिकारी, कर्मचारी आणि पूरबाधित नागरिकही या राजकीय दाैऱ्यांना वैतागले आहेत. त्यामुळे आता हे दाैरे पुरे करा, आम्हाला काम करू द्या, अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.