चिपळूण : एका गतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याने याप्रकरणी तिची व तिच्या नवजात बालकाची डीएनए तपासणी करण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टराला मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. हा संपूर्ण प्रकार समज- गैरसमजुतीने घडल्याने त्यावर तूर्तास पडदा पडला आहे. मात्र, संबंधित डॉक्टरासह त्याच्या अन्य सहकाऱ्यांनीही आपले राजीनामे वैद्यकीय अधीक्षकांकडे सादर केले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत डॉक्टरांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने येथील वैद्यकीय यंत्रणा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका गतिमंद मुलीची येथील शासकीय रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली. मात्र तिच्यावर अज्ञाताने अत्याचार केल्याचा संशय असल्याने संबंधित संशयित व्यक्ती व त्या नवजात बालकाचा डीएनए तपासला जाणार आहे. त्यासाठी देवरुख येथील पोलिसांच्या उपस्थितीत त्या नवजात बाळाला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधून वेळ घेतली होती. मात्र, मुख्य डॉक्टर उपलब्ध न झाल्याने हे सर्वजण नवजात बालकाला घेऊन त्या डॉक्टरांच्या कक्षात थांबले होते. यावेळी दोन तासांनी एका प्रशिक्षित डॉक्टराने तेथे येऊन तुम्हाला इथेच थांबायचे आहे की, डीएनए करायचे आहे, अशा अर्वाच्य शब्दात विचारणा केली. यावर संबंधित सामाजिक कार्यकर्त्या महिलेने त्यांना रोखले आणि तुमच्या डॉक्टरांनी या कक्षात थांबा असे सांगितले म्हणून थांबलो आहोत, असे सुनावले. त्यातून शाब्दिक चकमक झाली आणि मारहाणीचा प्रकारही घडला.
अखेर संबंधित वैद्यकीय अधीक्षकाने वेळीच लक्ष घालत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतरही प्रशिक्षित डॉक्टरांनी याविषयी पोलीस स्थानकात धाव घेतली. मात्र तेथे या वादावर पडदा टाकण्यात आला. त्यानंतर संबंधित डॉक्टरासह अन्य सहकारी डॉक्टरांनी गतवर्षीही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे दरवेळी असे प्रसंग उद्भवत असतील तर राजीनामा देतो असे जिल्हाधिकाऱ्यांना कळवून त्यांनी आपले राजीनामे वैद्यकीय अधीक्षकांकडे सादर केले आहेत.
............................................
‘त्या’ महिलेने दिला माफीनामा
संबंधित सामाजिक कार्यकर्त्या महिलेने कोरोनाच्या परिस्थितीत डॉक्टर करीत असलेल्या कामाचा आदर ठेवत त्यांनी आपला माफीनामा दिला आहे. समज-गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असून त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या या माफीनाम्यानंतर या प्रकरणावर तूर्तास पडदा पडला आहे. मात्र, डाॅक्टरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कैफियत मांडल्याने काय हाेते, याकडे लक्ष लागले आहे.