राजापूर : रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (युडीसीटी) संस्थेचा चतुर्थ दीक्षान्त समारंभ कुलपती डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यामध्ये वात्सल्य मंदिर, ओणी-राजापूर या संस्थेतील विद्यार्थी डॉ. गॉडफ्री फर्नांडिस याला केमिस्ट्री या विषयात उपकुलपती जी. डी. यादव यांच्या हस्ते डॉक्टर व फिलॉसॉफी (सायन्स) ही पदवी प्रदान करण्यात आली.फर्नांडिस हा विद्यार्थी आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या छोट्या भावासह बालकाश्रम, ओणी येथे दाखल झाला. संस्थेत राहून त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीत त्याला ५६ टक्के गुण मिळाले. परंतु निराश न होता स्वत:ची जिद्द, अभ्यासूवृत्ती, संस्थेचे पाठबळ, डॉ. महेंद्रमोहन यांचे प्रोत्साहन या सर्वांच्या जोरावर त्याने पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी गाठली. रत्नागिरी येथे बीएस्सीला ७४ टक्के गुण मिळाले. त्याच्या नशिबाने त्याचवर्षी मुंबई विद्यापीठामार्फत रत्नागिरी येथे एमएस्सी शिक्षणाची सोय झाली व तेथून एमएस्सी ७८ टक्के मिळवून कोकण विभागात पहिला येण्याचा मान मिळवला. रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (युडीसीटी) जगतमान्य संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळवून केमिकल्समधून त्याने पीएच. डी. केली. त्याला दोन पेटंट मिळाली. त्याला डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.फर्नांडिस याने आपला शोधप्रबंध वात्सल्य मंदिर, ओणी या संस्थेला व डॉ. महेंद्रमोहन यांना अर्पण केला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीदेवी गुजर, कार्यवाह गीता प्रभू, कार्यकारिणी सदस्य बाळकृष्ण चव्हाण, रुपेश रेडेकर आदी उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह अॅड. एकनाथ मोंडे, संचालक डॉ. महेंद्र मोहन, आशा गुजर, नूतन विद्यामंदिर, ओणी या संस्थेचे अध्यक्ष तुळसणकर, कार्यवाह शहाजीराव खानविलकर, खजिनदार छगन पटेल, शाळेतील सर्व शिक्षक अलोक गुजर, सुवर्णा राघव आणि गोकुळ परिवार यांनी त्याचे अभिनंदन केले. राजापूर तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)ओणी येथील बालकाश्रमात गॉडफ्री फर्नांडिस याने घेतले होते शिक्षण, अनाथालयातील बालकाने केला होता प्रवेश.संस्थेच्या बालकाश्रमात राहून भावासह त्यांनी केले होते शिक्षण पूर्ण. जिद्द, अभ्यासाच्या बळावर मिळवली डॉक्टरेट.
बालकाश्रमातील विद्यार्थ्याला डॉक्टरेट
By admin | Published: February 23, 2015 9:48 PM