लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी खासगी रुग्णालयांमध्येही शुल्क घेऊन ही लस देण्यात येत होती; परंतु आता लसीचा देशस्तरावरच तुटवडा मोठ्या प्रमाणावर पडू लागल्याने खासगी रुग्णालयांमधील लसीचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ११ लाख ८२ हजार कोरोना लसीचे लाभार्थी आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के लोकांनाच लस मिळाली आहे. त्यापैकी पावणेचार लाख लोकांना पहिला डोस आणि १ लाख लाेकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. लसीचा पुरवठा अपुरा असल्याने खासगी रुग्णालयातही लस उपलब्ध नाही.
लसीसाठी धडपड...
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय आहे. त्यासाठी सुरुवातीला खासगी रुग्णालयात २५० रुपये देऊन ही लस घेता येत होती; परंतु आता खासगीसह सरकारी रुग्णालयातही लस मिळणे अवघड झाले आहे.
कोरोना लस आता विकतही मिळत नाही आणि मोफतही नाही
शासनाने सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केली आहे. परंतु सुरुवातीला ज्यांना मिळाली त्यांना आता दुसरा डोस मिळण्यासाठी यातायात करावी लागत आहे. सुरुवातीला २५० रुपयांत खासगी रुग्णालयांमध्ये लस मिळत होती. परंतु आता तीही मिळत नाही.
- एस. आर. कांबळे, नागरिक, रत्नागिरी
शासनाने सुरुवातीसारखी खासगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करून द्यायला हवी. कोरोना लस महत्त्वाची असल्याने बहुतांशी लोक ही लस खरेदी करून घेतील. पण आता शासनाकडून मोफतही लस मिळेनाशी झाली आहे आणि विकतही घेता येत नाही.
- प्रतिभा नामजोशी, नागरिक, रत्नागिरी
सध्या लस अपुरी असल्याने लस न घेणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाल्यास जिल्ह्यात प्रत्येक दिवशी अगदी १५ हजारांपेक्षाही अधिक नागरिकांना लस देण्याची तयारी आरोग्य यंत्रणेने ठेवली आहे.
- डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
शासनाने सुरुवातीला टप्प्याटप्प्याने लस देण्याची घोषणा केली. त्यानुसार कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येत होती.
१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले; मात्र तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाला खीळ बसत आहे.