संदीप बांद्रे ।चिपळूण : रानावनात औषधी वनस्पती व मध पोळ्यांच्या शोधात फिरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कातकरी समाजातील दीडशे ते दोनशे कुटुंब जागेअभावी ‘घरकुल आवास’ योजनेपासून वंचित आहेत. या कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षात अवघ्या १६ जणांना ‘शबरी घरकुल आवास’ योजनेचा लाभ मिळाला आहे.या समाजातील प्रत्येक जण आपल्या संसाराचा गाडा ओढताना स्वत:चे घर असावे अशी कल्पनादेखील आपल्या मनात आणत नसावा. जिथे रोजच्या खाण्या-जगण्याचीच खात्री नाही तिथे घराचे स्वप्नही त्यांना परवडत नसावे. म्हणूनच वर्षानुवर्ष झोपडीतील जगणे त्यांनी प्रिय मानले आहे. स्वत:ची जागाच नाही तर घर कसे बांधणार, हा विचार त्यांच्या मनात ठासून भरलेला असल्यानेच घराची कल्पना त्यांच्या मनाला शिवत नसावी.वर्षानुवर्षे या समाजाची पिढी येथे वाढत आहे. आजही अनेक कुटुंबांचे स्वत:चे घर नाही. जागा मिळेल तेथे वास्तव्य करून प्रत्येकजण जीवन जगत आहे. तालुक्यात अशी सुमारे दीडशे ते दोनशे कुटुंब असल्याची माहिती आदिवासी आदिम कातकरी संघटनेमार्फत देण्यात आली आहे.कातकरी समाजाच्या घरकुलांसाठी शासनामार्फत ‘शबरी आवास योजना’ राबवली जाते. मात्र, या योजनेचा गेल्या तीन वर्षात अवघ्या १६ जणांनी लाभ घेतला आहे. २०१६-१७ मध्ये १४ जण, २०१७-१८ व २०१८-१९मध्ये प्रत्येकी एक घरकुल आकले, नांदिवसे, तिवरे व कुंभार्ली येथे उभारण्यात आले. संबंधित जमीनमालकाने बक्षीसपत्रामार्फत जागा दिल्याने हा प्रश्न सुटला. तसेच तत्कालिन तहसीलदार जीवन देसाई यांच्या प्रयत्नांतून काही कुटुंबांच्या घराखालील जमीन त्यांच्या नावे करण्यात आल्याने काहींना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही, हाच आता प्रश्न आहे.शेतात मजुरी, औषधी वनस्पती, मध आणि मासेचिपळूण तालुक्यातील मुंढे तर्फे चिपळूण, कुटरे, निरबाडे, नांदगाव, मांडकी बुद्रुक, आकले, तिवरे, नांदिवसे, कुंभार्ली, कादवड, रिक्टोली, गाणे, कळकवणे, ओवळी, पिंपरी खुर्द, बौद्धवाडी, पेढांबे, नागावे आदी गावांमध्ये कातकरी समाजाची लोकवस्ती आहे. एखाद्या गावातील जमीनदाराच्या जागेत वस्ती करून त्याची शेती-वाडीची कामे करायची आणि आपला घरसंसार चालवायचा. तसेच वेळ पडल्यास रानात जाऊन औषधी वनस्पती व मध पोळ्यांचा शोध घेऊन त्यातून थोडीफार कमाई करुन आपल्या झोपडीत पुन्हा विसावा घ्यायचा, हा या समाजाचा नित्यक्रम असतो. त्याचबरोबर गावच्या नदीत जाऊन मासेमारी करणे हादेखील या समाजाचा व्यवसाय मानला जातो. अर्थात त्यातून फारच तुटपुंजे उत्पन्न त्यांच्या वाट्याला येते.
जंगलातल्या या ‘शबरीं’साठी कोणी घर देता का... घर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 1:00 AM