राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे वन्य प्राण्याच्या शिकारीसाठी गेलेल्या एका प्रौढाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परिसरात अजूनही काही ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे. त्यातच शिकारीनंतर मांस नेण्यासाठी राजापूरच्या शेजारील तालुक्यास थेट ठाण्यातील कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्या गाड्या दाखल झाल्या होत्या, अशीही चर्चा सुरू आहे.आडिवरे परिसरातील नवेदर येथील अनिल शंकर भालवलकर (४१) आणि संजय विठ्ठल पड्यार (४७) हे दोघेजण शिकारीसाठी धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात गेले होते. शिकारीसाठी नेलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून अनिल भालवलकर याच्या पोटाला लागून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी संजय विठ्ठल पड्यार, अनिकेत अनिल ठुकरूल (३२, रा. भिकारवाडी, नवेदर), योगेश बाळकृष्ण रायकर (२८, रा. भिकारवाडी, नवेदर), संदेश सूर्यकांत पोवार (२३, रा. पोवारवाडी, कोंडसर बुद्रुक), रूपेश धोंडे रांबाडे (३५, पोवारवाडी, कोंडसर बुद्रुक), सिद्धार्थ दत्ताराम तिर्लोटकर (२७, रा. दसुरवाडी, धाऊलवल्ली), संतोष गणपत दळवी (४५, पारवाडी, धाऊलवल्ली), नीलेश बबन शेडेकर (३१, रा. भिकारवाडी, कोंडसर) आणि निवृत्तीनाथ शांताराम गोराठे (४०, रा. नवेदरवाडी, नवेदर) या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते. त्यातील संजय पड्यार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, उर्वरित सर्वांची जामिनावर मुक्तता केली होती.ही घटना ताजी असतानाच आडिवरे परिसरात काही दिवसांपूर्वी वन्य प्राण्याची शिकार करण्यात आल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या भागातील काही ग्रामस्थ वारंवार शिकारीसाठी जात असून, मांसाची विक्री करत असल्याचीही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या शिकारीनंतर त्याचे मांस नेण्यासाठी कायद्याचे रक्षक असणारेच दाखल झाले होते.सुरक्षेचे रक्षकच सामील?तब्बल तीन गाड्यांमधून आलेल्या या रक्षकांनी डबे भरून मांस नेल्याची चर्चा सुरू आहे. हे मांस नजीकच्या तालुक्याबरोबरच ठाण्यापर्यंत नेण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. शिकारीसाठी गेलेल्या व्यक्तींचे या रक्षकांशी मैत्रीचे संबंध असून, मांस नेण्यासाठी तीन गाड्या आल्या होत्या.