लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावू लागल्याने आता सर्वत्रच सतर्कता बाळगावी लागत आहे. त्यामुळे प्रवासातही कोरोनाच्या नियमांचे पालन होतेय, ना ही दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आता जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची ॲंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असून त्यासाठी ७२ तासांचा अहवालही अनिवार्य केला आहे. प्रवासादरम्यान मास्क वापरला नाही, तर ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षाही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग पहिल्या लाटेदरम्यान वाढू लागल्याने कोकण मार्गावरील सर्वच रेल्वे पाच महिने बंद होत्या. मात्र, गेल्या गणेशोत्सवापासून पुन्हा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही प्रादुर्भाव वाढल्याने कोकण रेल्वेच्या नियमित फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता यापैकी २३ गाड्या या मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर गाड्या मात्र अद्याप सुरू झालेल्या नाहीत. गाड्या सुरू करतानाही कोरोनाची चाचणी प्रवाशांना सक्तीची केली आहे.
गणेशोत्सवासाठी स्पेशल
सध्या पॅसेजर गाड्या आणि तेजस डबल डेकर बंद होती.
तेजस डबल डेकर ही गाडी येत्या ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे.
दोन पॅसेंजर गाड्यांबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही.
सध्या मार्गावर २३ नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष गाड्याही सुरू आहेत.
गणेशोत्सवासाठीही चार विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
काेराेना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक रेल्वेने कुठेही जाताना प्रशासनाने कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. महाराष्ट्राबाहेरच्या कुठल्याही राज्यात जायचे असेल तर जातानाच कोरोना चाचणीचा ७२ तासांचा अहवाल सोबत बाळगावा लागतो तसेच लसीकरण केल्याचे प्रमाणपत्रही सोबत ठेवावे लागते. प्रत्येक राज्यात जाताना रेल्वेच्या कुठल्याही स्थानकावर उतरल्यानंतर कोरोना चाचणीचा ७२ तासांचा अहवाल सोबत बाळगावा लागतो. त्याचबरोबर लसीकरण केले असल्याचे त्याचे प्रमाणपत्र सोबत न्यावे लागते. लसीकरण केले नसल्यास चाचणी करणे सक्तीचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रवाशासाठी मास्कचा वापरही सक्तीचा आहे. मास्क नसल्यास त्या प्रवाशाला ५०० रुपयांचा दंड आकारला जातो.
पॅसेंजर कधी सुरू हाेणार?
कोकण रेल्वे मार्गावर दादर-सावंतवाडी आणि दिवा पॅसेजर या दोन गाड्या सुरू होत्या.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने या गाड्या बंद करण्यात आल्या.
पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सामान्यांची गैरसोय होत आहे.
कोकण रेल्वेने प्रवास करताना ॲंटिजन तसेच आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल तसेच लसीकरण प्रमाणपत्र पाहिले जाते. मास्क नसल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागतो. सध्या २३ गाड्या सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने चार विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. या गाड्यांची आरक्षणेही आताच फुल्ल झाली आहेत.
- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे, रत्नागिरी
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेना गर्दी कायम
सध्या इतर राज्यांमध्ये जाताना किंवा येताना प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. लस नसल्यास ॲंटिजन चाचणीचा तसेच आरटीपीसीआर अहवाल अनिवार्य केल्याने इतर राज्यात जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. मात्र, मुंबईतून येणाऱ्यांची तसेच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत आहे.
रेल्वे स्थानकावर उतरताना किंवा चढताना कोरोनाच्या नियमांचे पालन होतेय ना, हे पाहिले जाते. मास्क नसेल तर ५०० रूपये दंडाचा सामना कराव लागतो.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
कोकणकन्या एक्स्प्रेस
तुतारी एक्स्प्रेस
मांडवी एक्स्प्रेस
जनशताब्दी एक्स्प्रेस
मंगला एक्स्प्रेस आदींसह कोकण रेल्वेमार्गावर सध्या २३ गाड्या सुरू आहेत.