रत्नागिरी - मला चौकशीची नोटीस आली आहे. मी चौकशीला सामोरे जाणार आहे. मी निर्दोष आहे. मी स्वच्छ आहे. अशा धमक्यांना भीक घालत नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला अटक करा, असे प्रतिआव्हान राजापूरचे आमदार तथा ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेतून दिले.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. त्यासाठी त्यांना ५ डिसेंबरपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नाेटीसनंतर आमदार राजन साळवी यांनी रविवारी (४ डिसेंबर) रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट राज्यकर्त्यांनाच ललकारले आहे.
मला नोटीस मिळाल्याचे दु:ख आहे. तुम्हाला तुरुंगात टाकू अशा धमक्या मला काही लोकांकडून मिळाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तुरुंग मला काही नवीन नाही. जनतेच्या हितासाठी लोकांच्या प्रश्नांसाठी मी अनेकदा तुरुंगात गेलो. त्यामुळे मला कुणी धमकी देऊ नये, असा इशाराही आमदार राजन साळवी यांनी दिला.
‘ते’ भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ हाेतात -अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. संपूर्ण देशात, महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांची बेहिशोबी मालमत्ता आहे, असे लोक भाजपमध्ये गेल्यावर ताबडतोब स्वच्छ होतात. निर्दोष होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, असे आमदार साळवी म्हणाले.