व्यापारी त्रस्त
खेड : खेड - भरणे मार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. बाजारपेठेमध्ये जनावरे बस्तान मांडत असून, परिसर अस्वच्छ करत आहेत. व्यापारी गाळ्यांसमोर अस्वच्छता वाढली असून, दररोज सफाई करावी लागत असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मोफत औषधांची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील दुभती जनावरे, बैल व अन्य जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने औषधे उपलब्ध व्हावीत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. शेतकरी, कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही मागणी केली आहे.
आंदोलनाचा इशारा
चिपळूण : रामपूर ते गुढे मार्गावर खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करुनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी न झाल्यास आंदोलनाचा इशारा आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस सुभाष मोहिते यांनी दिला आहे.
प्रवाशांना नाष्टा
रत्नागिरी : रात्रीचा प्रवास करताना चालकाला झोप अनावर होऊन अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांसाठी चहा, बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. हातखंबा टॅप पोलीस दलाच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेची रंगरंगोटी
रत्नागिरी : जिल्हा परिषदचे मुख्य प्रवेशद्वार व त्याठिकाणी असलेले विविध बोर्ड व अस्वच्छता दूर करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतींनी आढावा घेतला. या परिसराची रंगरंगोटी करुन तो आकर्षक करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हा परिषदेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, इमारत व परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.
प्रशांत सावंत यांची निवड
खेड : मालदीव येथे दि. २२ व २५ सप्टेंबरअखेर होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशांत सावंत यांची भारतीय संघात निवड झाली आहे. राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कारप्राप्त दिव्यांग खेळाडू प्रशांत सावंत यांच्या निवडीबद्दल भरणेचे माजी सरपंच राजाराम बैकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
इंधनाचा तुटवडा
दापोली : येथील पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा उपलब्ध नसल्याने शिवाय इंधन घेऊन येणाऱ्या गाड्या वेळेवर न आल्याने इंधनाचा तुटवडा जाणवला. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी दुपारी इंधन उपलब्ध झाल्यानंतर वाहनचालकांची गैरसोय दूर झाली.
मार्गदर्शन वर्ग
देवरुख : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त मार्गदर्शनपर वर्ग आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. धनंजय दळवी, निसर्ग मंचप्रमुख प्रा. मयुरेश राणे यांनी ओझोनचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
रुग्णवाहिकेचा अपघात
रत्नागिरी : विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला भेट दिलेल्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला आहे. सातारा येथे हा अपघात झाल्याने रुग्णवाहिकेचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चालकाचा ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याकडेला शेतात जाऊन कलंडली.