रत्नागिरी : शहरातील मिऱ्या समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमीत रक्ताळलेले महिलेचे कपडे सापडले. त्याचबरोबर बाजूला काहीतरी पुरल्याच्या खूणा सापडल्या. त्यामुळे सारी यंत्रणा कामाला लागली. मात्र, प्रत्यक्षात खोदकाम केल्यानंतर तेथे श्वान पुरलेला असल्याचे लक्षात आले.रविवारी हा प्रकार घडला. मिर्या येथील स्मशाभूमीजवळ काहीतरी पुरल्याचा संशय होता. बाजूला रक्ताळलेले कपडे पडले होते. पुरलेल्या ठिकाणी वस्तू ठेवल्या होत्या. खून करून मृतदेह पुरल्याचा अनेकांचा संशय होता. तशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. रविवारी सायंकाळी पोलीस, ग्रामसेवक, स्थानिक ग्रामस्थ गोळा झाले. मिर्या गावात बातमी पसरली आणि ही गर्दी झाली.कामगार, खोरे, पिकाव आदी मागवले आणि खोदकाम सुरू झाले. दीड फुटाच्या खाली एक पांढरा कपडा लागला. त्यामुळे काहीतरी पुरल्याचे निश्चित झाले. बाजूची माती काढण्यात आली. फावड्याने माती ओढत असताना मोठे केस वर आले.
ते पाहिल्यावर पोलिसांनी श्वान असल्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर कापडासहित त्याला वर काढण्यात आले. त्यावेळी माणसाऐवजी शेफर्ड जातीच्या पाळीव श्वानाचा मृतदेह पुरण्यात आल्याचे उघड झाले. पण रक्ताळलेले कपडे घटनास्थळी आढळल्याने काहीतरी घातपात झाल्याचा संशय होता. मात्र, तो निष्फळ ठरला.