अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने ताम्हणे - धनगरवाडीतील ६५ वर्षीय वृद्धाला औषधाेपचारासाठी चक्क डाेलीतून नेण्याची वेळ येऊन ठेपली.
स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यातील सर्वच धनगरवाड्या साेयी-सुविधांपासून काेसाे दूर राहिल्या आहेत. धनगरवाड्यांमधील पाण्याची समस्या कित्येक वर्ष सुटलेलीच नाही तर वाड्यांमध्ये जाण्यासाठी साधा रस्ताही हाेऊ शकलेला नाही. निवडणुकांवेळी केवळ आश्वासनांची खैरात करणारे निवडणुकीनंतर या वाड्यांकडे फिरकतही नसल्याने या वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट हाेत चालली आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हणे - धनगरवाडीकडे जाण्यासाठी अवघा ४ किलाेमीटरचा रस्ता हाेणे गरजेचे आहे. मात्र, ताे करण्यासाठीही मुहूर्त मिळालेला नाही.
ज्येष्ठ ग्रामस्थ नाना धोंडू अचिर्णेकर हे १० सप्टेंबर २०२१ रोजी अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे हाेते. मात्र, काेणतेही वाहन धनगरवाड्यामध्ये येण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेर ग्रामस्थांनी डोलीतून आणून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रस्ता नसल्याने अनेकवेळा वाडीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत आहे. काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले.
प्रत्येक निवडणुकीत ताम्हणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना रस्ता करून देण्याचे जाहीर वचन देण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीनंतर या वचनाचा विसर पडत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनगरवाड्यातील ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
------------------
तब्बल ७१ प्रस्ताव रखडलेले
रत्नागिरी जिल्ह्यात ३०० धनगरवाड्या आहेत. या वाड्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वाड्यांमधील समस्यांबाबत शासनाकडे ७१ प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे आजही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या वाड्या सुविधांपासून वंचित आहेत.
----------------------
जिल्ह्यातील धनगरवाड्यांमध्ये मुलभूत सुविधाही नाहीत. धनगरवाड्यांचा तांडा वस्ती सुधार याेजनेत समावेश करण्यात आला आहे. पण, दाेन वर्षात निधीच मिळालेला नसल्याने याेजनेत समावेश करून उपयाेग काय? गेली १५ वर्ष मी शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ताम्हणे - धनगरवाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारांच्या घरासमाेरच उपाेषणाला बसणार आहे.
- रामचंद्र बाबू आखाडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबाेधन मंच.