साखरपा : येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये १९८९-९० या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी इथल्या कोविड केअर सेंटरला ३० हजार रुपयांची मदत केली. माजी विद्यार्थी तथा देवरुख पंचायत समितीचे सभापती जया माने यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे ही देणगी सुपूर्द करण्यात आली.
पथदीप बंद
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातून बहुसंख्य ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पथदीप सध्या बंदस्थितीत आहेत. विद्युत बिलांची रक्कम वेळेवर न भरल्याने पथदीप बंद करण्यात आल्याचे ‘महावितरण’कडून या ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. परंतु ग्रामपंचायतीने अद्याप बिले न भरल्याने पथदीप बंद करण्यात आले.
जीर्ण वृक्ष तोडावेत
शिरगाव : कराड-चिपळूण मार्गावरील पोफळी सय्यदवाडी येथील अब्बास सय्यद यांच्या घरासमोर सुकलेले जीर्ण झाड धोकादायक बनले आहे. हे झाड पडल्यास दुर्घटना घडण्याचा धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड तोडावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोरोना चाचणीला विलंब
रत्नागिरी : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे; परंतु या चाचण्यांचे अहवाल मिळण्यासाठी विलंब होत आहे. चाचण्या करणारे अहवाल येईपर्यंत घरात थांबून न रहाता इतरत्र फिरत रहातात. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग सर्वत्र फैलावत आहे. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे.
भातलावणीला वेग
सावर्डे : चिपळूण तालुक्यात शेतीची कामे आता वेगात होऊ लागली आहेत. योग्यवेळी पेरणी केल्याने रोपांची योग्य वाढ झाली आहे. त्यामुळे भातलावणीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सुरुवातीचा पाऊस चांगला झाल्याने ८ ते १० दिवसांतच रोपे तरारून आली असून लावणी उरकण्यासाठी शेतकरी घाई करत आहेत.
औषधी वनस्पतींची लागवड
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. औषधी वनस्पतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व लक्षात यावे या हेतूने दरवर्षी औषधी वनस्पतींची लागवड केली जाते.
छोट्या मूर्तींना मागणी
लांजा : शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने गणेशोत्सवासाठी नियमावली घालून दिली आहे. त्यानुसार यावर्षीही छोट्या मूर्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षीही तालुक्यात छोट्या गणेशमूर्तींना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. मूर्ती शाळांमध्ये आता कलाकारांची लगबग सुरू झाली आहे.
प्रवास होणार वेगवान
रत्नागिरी : रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरण येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास येत्या चार महिन्यांनंतर वेगवान आणि विनाअडथळा होणार आहे. क्राॅसिंग स्थानक प्रकल्पही पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अधिकच आरामदायी होणार आहे.
स्वराने पटकावले सुवर्णपदक
रत्नागिरी : शहरातील साै. गोदूताई जांभेकर विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा शिवणेकर हिने देशपातळीवरील ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशीप (बी. डी.एस.) परीक्षेत १०० पैकी ९४ गुण मिळवून सुवर्णपदक मिळविले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून कौतुक होत आहे.
कौशल्य विकास कार्यशाळा
लांजा : राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे १६ आणि १७ जुलैला लांजा महाविद्यालयात भाषिक काैशल्ये विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संहिता लेखन विषय आयोजित कार्यशाळेत दिग्दर्शक राजेश देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर मार्गदर्शन करणार आहेत.