असगोली : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाने मृत पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी गुहागर नगरपंचायतीची आहे. अंत्यसंस्कारासाठी सरणाची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांनी ४ टन लाकडे नगरपंचायतीला दिली आहेत.
कोरोनाच्या संकटात गुहागर तालुक्यातील रुग्णांना लवकर उपचार मिळावेत म्हणून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, तालुक्यातील रुग्ण अत्यवस्थ झाल्यावर उपचारांसाठी धावत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेत गुहागरमध्ये रुग्णालय नव्हते. त्यामुळे प्रशासनावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कमी प्रमाणात आली. यावेळी गुहागर शहरातच रुग्णालय झाल्याने कोविडग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गुहागर नगरपंचायतीवर आली आहे. गेल्या १५ दिवसांत अशा ३ रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागले. भविष्यात हे प्रमाण वाढले, तर गुहागर नगरपंचायतीचे लाकूडसाठ्याचे केलेले नियोजन कोलमडून पडेल. अधिक लाकूडसाठ्याची खरेदी करावी लागेल. सुकी लाकडे मिळाली नाहीत, तर पावसाळ्यात नागरिकांची अडचण होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून गुहागरमधील हॉटेल राजगडचे मालक, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे यांनी ४ टन लाकूडसाठा गुहागर नगरपंचायतीला विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. हा लाकूडसाठा नगरपंचायतीचे अधिकारी मंगेश पेढामकर आणि जगदाळे यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटप्रमुख व सभापती उमेश भोसले, युवा सेना शहर अधिकारी राकेश साखरकर, किरण शिंदे उपस्थित होते.
राजेश शेटे म्हणाले की, मृत्यूनंतरचे क्रियाक्रम करणे हे पुण्यकर्म आहे. आज कोरोनाच्या भयावह स्थितीत इच्छा असूनही आम्ही नगरपंचायतीला या कामात मदत करू शकत नाही. अशावेळी नगरपंचायत करत असलेल्या कामाला हातभार लावण्यासाठी सरण देणे हे मला शक्य होते. ही गोष्ट मी माझ्या काही मित्रांजवळ बोललो. त्यांना ही कल्पना आवडली. लगेचच लाकूड व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांनीही अत्यंत कमी वेळात लाकूडफाटा उपलब्ध करून दिला.