सदा चव्हाण यांची निवड
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील ग्रामस्थ, कामगार नेते सदा शिवाजी चव्हाण यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. ते गेली २५ वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सुयोग सहकारी पतपेढी, मुंबईचे उपाध्यक्ष, भाई जगताप मित्रमंडळ सरचिटणीस, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष असून सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत.
रामपूर माळरानावर वणवा
रामपूर : गुढे फाटा दाभोळ पॉवरसाठी पाणी पुरवठा टाकी ते देवरखेरकी सीमेपर्यत किमान ४० ते ४५ हेक्टरमध्ये शनिवारी दुपारी ४ ते ५ वाजताच्या सुमारास वणवा लावला. दरवर्षी येथे वणवा लावला जातो. काजू, करवंदे, आंब्याची झाडे ४० ते ५० आहेत. बाकी सर्व माळरान मोकळे आहे. त्यामुळे झाडे होरपळून नुकसान झाले.
चंद्रनगरच्या विद्यार्थ्यांनी तयार केले हस्तलिखित
दापोली : चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोना - एक संधी या विषयावर हस्तलिखित तयार केले आहे. शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या कल्पनेतून हा विचार पुढे आल्यानंतर सहावीच्या विद्यार्थ्यांनी हे हस्तलिखित तयार केले. हस्तलिखितातील कथा, निबंध, कवितांचे लेखन विद्यार्थ्यांनीच केले आहे. सेजल कोळंबे या विद्यार्थिनीने हस्तलिखिताचे संपादन केले आहे. लक्ष्मी शर्मा, श्रावणी कोळंबे, वेदांत पवार, धीरज शिगवण, सेजल कोळंबे या विद्यार्थ्यांनी या हस्तलिखिताचे सुलेखन केले आहे.
पदवीदान समारंभ
दापोली : न. का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालक उच्च शिक्षण कोकण विभाग, पनवेलचे डॉ. संजय जगताप उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जानकी बेलोसे, सदस्य शिवाजी शिगवण, रज्जाक काझी आदी उपस्थित होते.
बिजघर येथे नामफलकाचे अनावरण
खेड : तालुक्यातील बिजघर येथे श्री सांप्रदाय सेवा समिती, खेड सेवा केंद्राच्या बिजघर तिसंगी सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच समारंभपूर्वक झाले. कार्यक्रमाला माजी सभापती विजय कदम, पंचायत समिती सदस्य राजू कदम, तिसंगी गावचे पोलीसपाटील संतोष मोहिते, सेवा केंद्र अध्यक्ष सुनील लाड, अरविंद निकम, मिर्ले येथील दिनेश जाधव, भाऊ भोसले उपस्थित होते.
बालवैज्ञानिकसाठी धनंजय धुमाळची निवड
खेड : मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनमार्फत ऑनलाईन घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक द्वितीय पातळीवरील प्रात्यक्षिक परीक्षेत भरणे - बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील धनजंय धुमाळ यांने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या होमीभाभा बालवैज्ञानिक ऑनलाईन परीक्षेच्या कृती संशोधन व मुलाखतीसाठी त्याची निवड झाली आहे. प्रथम पातळीवरील परीक्षेत त्याने १०० पैकी ८१ गुण प्राप्त केले होते.