मंडणगड : तालुक्यातील निमदेवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ संजय निमदे यांनी तिडे निमदेवाडी जिल्हा परिषद शाळेला तीन हजार रुपयांची देणगी दिली आहे. शालेय साहित्य तसेच खेळाचे साहित्य यासाठी ही देणगी देण्यात आली आहे. मुख्याध्यापक आनंद सुतार यांच्याकडे रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
पाणी योजना सर्वेक्षण
दापोली : पंचनदी धरणातून ओणी, ओणनवसे, भाटी, नवसे, उसगाव, देर्दे, उंबरघर या गावांना पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुका संघटक उन्मेश राजे, जिल्हा परिषद व जलव्यवस्थापन समिती सदस्य अनंत करंबेळे, महिला तालुका संघटिका दीप्ती निखार्गे, उपअभियंता आनंदे, आदी उपस्थित होते.
वाढीव दर अमलबजावणी
रत्नागिरी : राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या परिपत्रकानुसार, गौण खनिजावर वाढीव दराने रॉयल्टी आकारण्यात येत आहे. याबाबतचा तपशील जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आता जिल्ह्यात वाळू व रेतीचे दर यावरील रॉयल्टी वाढीव दराने आकारण्यास सुरुवात झाली आहे.
शाळेत रक्तदान शिबिर
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाड्यातील खैर ए उन्मत फाऊंडेशन आणि मोहल्ला क्लिनीक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नगर परिषद शाळा क्रमांक १०मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या हस्ते झाले.
शहरात निर्जंतुकीकरण
खेड : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असतानाच आता डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. ही साथ रोखण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तांबे मोहल्ला, पटेल मोहल्ला आदी शहरातील भागांत निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.