लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही जणांना किरकोळ तर क्वचितच तीव्र स्वरूपाचा त्रास होतो. मळमळणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी आदी त्रास होत असले तरी लस प्रभावीपणे काम करीत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता काही जणांना अजिबातच त्रास झाला नाही तर लस खरी की खोटी दिली, असा गैरसमज मनात निर्माण होत आहे. मात्र, आरोग्य विभागाने लस घेतल्यानंतर त्रास झाला तरच परिणामकारक, असे अजिबात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या दोन्ही लसींबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज होते. त्यानंतर लस घेतल्यानंतर त्रास झाला तर ती लस चांगली असाही गैरसमज आहे. त्यामुळे ज्यांना त्रास झालेला नाही, अशांपैकी काहींना आपल्याला दिलेली लस बनावट तर नाही ना, अशी शंका येत आहे. मात्र, आरोग्य विभागाने हे नाकारले आहे.
कोविशिल्डचा त्रास अधिक
कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्डचा त्रास अधिक होत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. लस घेतल्यानंतर डोकेदुखी, लस घेतलेल्या ठिकाणी दुखणे, ताप येणे, अंग दुखणे, थंडी भरून ताप येणे आदी तात्पुरत्या स्वरूपाचा त्रास होतो. मात्र, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
लसीनंतर काहीच झाले नाही...
मी कोरोनाच्या कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, घेतल्यानंतर मला कुठलाच त्रास झाला नाही. काही जण म्हणतात, लस घेतल्यानंतर खूप त्रास होतो. पण मला काहीच त्रास झाला नाही.
- मंदा तांबे, गृहिणी, रत्नागिरी
आरोग्य विभाग म्हणतो की, लस घेतल्यानंतर त्रास झाला तर तो परिणामकारक असतो. पण मी कोव्हॅक्सिन लसचे दोन्हीही डोस घेतले तरीही मला काहीही त्रास झाला झाला नाही.
- यशवंत घोरपडे, शिक्षक, चिपळूण
त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही...
कुठल्याही लसचा त्रास झाला, नाही झाला, यावर त्या लसीचा प्रभाव अवलंबून नसतो. प्रत्येकाच्या बाॅडीटेंडन्सीप्रमाणे किरकोळ स्वरूपात किंवा तीव्र स्वरूपात त्रास होतो. मात्र, काहींना अजिबातच होत नाही. यावरून त्रास झाला नाही, म्हणजे ती लस खोटी आहे किंवा त्रास झाला तरच परिणामकारक आहे, असे अजिबातच समजू नये. हा गैरसमज आहे. मिळेल ती लस घेऊन आपण कोरोनापासून संरक्षण करूया.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी