रत्नागिरी - खेड येथील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली आहे. सोमवारी (26 मार्च)सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे असंख्य रिपब्लिकन कार्यकर्ते एकत्र जमू लागल्याने खेडमध्ये काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरात पुतळा विटंबनाचे प्रकार वाढत असल्याने हा प्रकारही त्यातूनच पुढे आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सकाळी उद्यानात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतरच लगेचच खबरदारी दाखवत पुतळा झाकून ठेवण्यात आला. पोलीस, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जमावाला शांत करत आहेत.
खेड-दापोली रस्त्यावर तीनबत्ती नाक्याजवळ तळ्याचा वाकण येथे हे उद्यान आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्यानाबाहेरच सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे. जोरदार घोषणाबाजीही सुरू केली आहे. विटंबना करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, खेड बंदचीही हाक देण्यात आली आहे.
काही कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधला. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आपण लगेचच देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.