मंडणगड : मंडणगड तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉ. प्रभाकर भावठाणकर यांचे योगदान हे उल्लेखनीय आणि स्मरणीय आहे. तालुक्यातील वैद्यकीय वाटचालीत त्यानी अनेक समाजोपयोगी उपक्रम, शिबिरे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलेली अविरत सेवा ही त्यांच्या कर्तृत्वाची पोहोचपावती असल्याच्या भावना व्यक्त करत, त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंडणगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तालुका आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यावतीने भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, माजी सभापती भाई पोस्टुरे, राजकुमार निगुडकर, रमेश दळवी, प्रकाश शिगवण, डॉ. गरुड, पोलीस निरीक्षक उत्तम पीठे, दीपक घोसाळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, डॉ. सगरे, डॉ. भगवान पितळे, डॉ. शेखर दाभाडकर, रघुनाथ पोस्टुरे, इरफान बुरोंडकर, भावठाणकर यांची पत्नी यांच्यासह वैद्यकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या ३४ वर्षांच्या सेवेपैकी तब्बल २४ वर्षे मंडणगडसारख्या दुर्लक्षित तालुक्यात सेवा करणाऱ्या डॉ. प्रभाकर भावठाणकर व पत्नीचा मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएशन व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ, सन्मानिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश इदाते तर सूत्रसंचालन दिलीप मराठे यांनी केले.