रत्नागिरी : येथील मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.शाश्वत शेरे यांच्या आईच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १६ सप्टेंबर सोनवडे (ता.संगमेश्वर) येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कै.विश्रांतीदेवी विद्याकुमार शेरे म्हणजेच पूर्वाश्रमीची द्वारका आत्माराम कापडी. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर, १९२१ रोजी झाला. ज्यावेळी स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि व्यवस्था गावगावातून नव्हती, त्या काळात द्वारकाताईच्या वडिलांनी त्यांना हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी पाठविले. त्या कर्तबगार होत्या. होमिओपॅथीचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या योगे त्यांनी रुग्णसेवा केली. कुटुंबातील होतकरू सभासदांना शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्यांना तीन अपत्ये. पहिली मुलगी रुजुता अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. प्रथम पुत्र देवराज आता हयात नाही आणि द्वितीय पुत्र म्हणजे रत्नागिरीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे.
डॉ.शेरे यांनी रत्नागिरीमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून १९८३ पासून रुग्णसेवा सुरू केली. रत्नागिरीमधील शासकीय मनोरुग्णालयात अधीक्षक म्हणून काही वर्षे काम पाहिले. नुकतीच त्यांची राज्य शासनाकडून राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर खासगी क्षेत्रातील नामवंत मनोविकार तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी माध्यमिक विद्यालय सोनवडे येथे त्यांचा आईच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आहे.