रत्नागिरी : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (१४०.३) स्पर्धेत भाग घेत, खडतर स्पर्धा नियोजित वेळेच्या आत पूर्ण करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. कोकणातील पहिला ‘आयर्नमॅन’ बनण्याचा सन्मान मिळवला आहे.
डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून दोन वर्षे कठोर परिश्रम केले. आजारमुक्त झाल्यावर वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आणि मित्रांसोबत सायकलिंग सुरू केले. चिपळूण सायकलिंग क्लबने मोठा पाठिंबा दिला. केमोनंतर वर्षभरात अशक्यप्राय वाटणारी बीआरएम पूर्ण केली.
आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एका पाठोपाठ करावयाच्या असतात. डॉ. तेजानंद हे ३.९ किलोमीटर पोहले. २.४७/१०० मीटर या वेगाने त्यांनी हे अंतर १ तास ४५ मिनीटे २८ सेकंदात पूर्ण केले. २३.२७ किमी/तास या वेगाने १८० किलोमीटर सायकलिंग केले. याकरिता त्यांना ७ तास ४४ मिनीटे व ९ सेकंदाचा वेळ लागला. त्यानंतर त्यांना धावायचे होते. त्यांनी ४२ किलोमीटर धावण्यासाठी ५ तास २९ मिनीटे १४ सेकंद लागले. ७.४९ मिनिट्स प्रति किमी या वेगाने ते धावले. हे तीनही क्रीडा प्रकार एका पाठोपाठ पूर्ण केले. याकरिता त्यांना एकूण वेळ १५ तास १७ मिनीटे व ४२ सेकंद लागले. या वेळेत त्यांनी एकंदर अंतर २२६.७ किमी अंतर पार केले.
डॉ. गणपत्ये यांचा धावणे, पोहणे, सायकलिंगचा नियमित सराव सुरू होता. कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. कागल येथे ऑलिंपिक डिस्टन्स, नगर येथे झालेल्या २१ किलोमीटर रनिंग हाफ मॅरेथॉन, ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलोन (बेळगाव) आणि पुणे, कोल्हापूर, सातारा येथे ३ हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलोन पूर्ण केल्या. त्यानंतर कझाकिस्तान येथे यश मिळवून आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वस्तरातून काैतुकाचा वर्षाव होत आहे. पत्नी डॉ. अश्विनी, चिपळूण सायकलिंग क्लब व मित्रांच्या पाठिंब्यामुळे यश संपादन केले असल्याचे डाॅ. गणपत्ये यांनी सांगितले.