लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर करताच पाेलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे़ रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लाॅकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी हाेण्यासाठी पाेलिसांनी ड्राेन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे़ ड्राेन कॅमेऱ्यांद्वारे शहरात बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे़
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे़ त्याची अंमलबजावणी ३ जूनपासून सुरू झाली आहे. लाॅकडाऊनच्याकाळात केवळ ‘अत्यावश्यक सेवे’ला मुभा देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे़ त्याचबरोबर विविध भागांत पेट्रोलिंगही सुरू आहे. मात्र, शहराची व्याप्ती पाहता शहरातील अंतर्गत मार्गावर लक्ष ठेवणे कठीण जात आहे़ या छुप्या मार्गांचा वापर करून नागरिक घराबाहेर पडत आहेत़ लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी हाेण्यासाठी रत्नागिरी शहरात ड्राेन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे़ नागरिकांनी कितीही छुप्या मार्गाने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पाेलीस दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या ड्राेन कॅमेऱ्याचे गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले़ यावेळी रत्नागिरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस कॉन्स्टेबल नरेश नवले उपस्थित होते.
-----------------------------
लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी हाेण्यासाठी रत्नागिरी शहरात ड्राेन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे़ या ड्राेन कॅमेऱ्यांचे मारुती मंदिर येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले़ यावेळी पाेलीस अधिकारी उपस्थित हाेते़ (छाया: तन्मय दाते)