रत्नागिरी : घराशेजारी धरण आहे, म्हणून नदी किनाऱ्याजवळ नवीन घर बांधले. पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वीच अद्ययावत सुविधांनी युक्त घर बांधलं. घराचं काम पूर्ण झाल्यावर मी पुण्यात गेले. येथे आल्यावर घर, वाडीची अवस्था पाहताच रडू कोसळले. पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, अशी प्रतिक्रिया चिपळूण तालुक्यातील तिवरे - भेंदवाडीतील मंदा धाडवे यांनी व्यक्त केली.घराची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनाही आपले रडू आवरता आले नाही. त्यांनी सांगितले की, मी व माझे कुटुंब वाचले असले तरी शेजारी गेल्याचे दु:ख मोठे आहे. धरण फुटल्याची घटना समजताच माझ्या मुलांनी तातडीने गावाकडे धाव घेतली. मला हृदयविकाराचा त्रास असल्याने मुलं सोबत आणत नव्हती. मात्र, मी हट्ट करून आले.घराशेजारी धरण असल्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होते. पै-पै गोळा करून गावात घर बांधले. सिमेंट काँक्रिटचे घर बांधून काचेची तावदाने असलेल्या खिडक्या बसवल्या. घरात फ्रिज, गॅस सिलिंडरपासून लोखंडी कपाट, टेबल, खुर्च्या सर्व साहित्यांनी युक्त घर टापटीप केले होते. आता घराची अवस्था पाहून अश्रू थांबत नाहीत. खिडक्यांच्या काचा फुटून घरात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण घरात चिखलच चिखल आहे. उभे राहण्यासाठीही जागा नाही, बहुतांश सामानही वाहून गेलं आहे. ज्या हेतूने घर उभारले ते स्वप्नच मुळी विरले आहे. शेजारीदेखील राहिले नाहीत, त्यामुळे आता गावात राहण्याचीही इच्छा राहिलेली नाही.यावेळी कोणी कोणाचे सांत्वन करावे, हा प्रश्न आहे. गावातील शाळेमध्ये सर्वांना ठेवण्यात आले आहे. पार्वती गायकवाड या महिलेलादेखील १४ वर्षाचा संसार उघड्यावर पडल्याचे दु:ख आहे. गेली १४ वर्षे या गावात राहत आहे. परंतु, धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या.
पर्यटन व्यवसायाचे स्वप्न अधुरेच...- मंदा धाडवे यांना अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 3:46 PM
धरण फुटल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. आता उभे रहायलाही जागा नाही. ज्या घरात संसार केला ते घरही राहिले नाही, शेती केली ती शेतीही उरली नाही? आता पुढे काय करावे? असा प्रश्न पडल्याचे सांगून त्या धाय मोकलून रडल्या.
ठळक मुद्दे तिवरेतील धरण दुर्घटनेत संपूर्ण घरच उद्ध्वस्त